दुष्काळग्रस्तांची पोलीस भरतीसाठी धावपळ
By admin | Published: April 1, 2016 02:53 AM2016-04-01T02:53:02+5:302016-04-01T02:53:02+5:30
राज्यभरात दुष्काळाचे सावट आहे. शेतीमध्ये काम राहिले नाही, तसेच शिक्षण घेवून देखील उपासमारीची वेळ आली आहे. नोकऱ्या मिळत नाहीत अशा परिस्थितीत दुष्काळग्रस्त तरुणांनी थेट
- वैभव गायकर, पनवेल
राज्यभरात दुष्काळाचे सावट आहे. शेतीमध्ये काम राहिले नाही, तसेच शिक्षण घेवून देखील उपासमारीची वेळ आली आहे. नोकऱ्या मिळत नाहीत अशा परिस्थितीत दुष्काळग्रस्त तरुणांनी थेट नवी मुंबईकडे आपली धाव घेतली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय व तळोजा मध्यवर्ती कारागृहातील भरतीसाठी हे तरुण कळंबोली पोलीस मुख्यालयात चाचणीसाठी आले आहेत.
पोलिसांच्या ९० जागांसाठी तब्बल १४,०३३ अर्ज नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाला प्राप्त झाले आहेत. यामध्ये सर्वात जास्त संख्या दुष्काळी पट्ट्यातील तरुणांची आहे. अकोला, धुळे, सातारा, सांगली, नंदुरबार, बीड, औरंगाबाद, लातूर आदीसह मराठवाडा व विदर्भाच्या लहान खेड्यातून तरुण याठिकाणी आलेले आहेत. लांबचा प्रवास करून आलेल्या तरुणांना बस स्थानक, रेल्वे स्थानकावर रात्र घालवावी लागत आहे.
कागदपत्रे तपासणीसाठी वेगळी तारीख त्यानंतर शारिरीक चाचणीसाठी वेगळी तारीख यामुळे काहींना हेलपाटे मारावे लागणार आहेत तर काही जण याच ठिकाणी मुक्कामाला थांबले आहेत. नंदुरबार याठिकाणाहून आलेला मच्छींद्र भोई हा वीस वर्षीय तरुण २९ तारखेला याठिकाणी आलेला आहे. ठाण्याला मामा असल्याचे त्याने त्याच ठिकाणी आपला मुक्काम केला आहे. अकोला येथून आलेला श्रीकृष्ण मुंडेकर हा तरुण दोन दिवसांपासून नवी मुंबईत आलेला आहे. परिस्थिती हलाखीची असल्याने रस्त्यावरच मुक्कामाला राहावे लागणार असल्याचे त्याने सांगितले. रस्त्यांच्या दुभाजकावर लावलेल्या झाडांच्या सावलीत तरुण बसत असल्याने अपघाताचा धोका असल्याचे काहींनी सांगितले.
पोलीस मुख्यालयाच्या बाहेर सुरु असलेल्या एका बांधकाम साइटवरील पत्र्यांचा आधार घेवून अनेक तरुण विसावा घेत असल्याचे याठिकाणी दिसून येत आहे. परीक्षार्थींसोबत आलेल्या पालकांचे देखील हेच हाल आहेत.
शासनामार्फत परीक्षार्थींसाठी कोटींचा निधी खर्च केला जातो, तो जातो कुठे? असा प्रश्न याठिकाणी उपस्थित असलेल्या गणपती पाटील या पालकाने उपस्थित केला.
परीक्षार्थींसाठी बसायची व्यवस्था नाही. मुख्यालयाबाहेर थांबलेल्या विद्यार्थ्यांना आंघोळ तसेच झोपण्याची काहीच व्यवस्था नाही.