- नामदेव मोरेनवी मुंबई : विदर्भामधून दुष्काळग्रस्त मोठ्या प्रमाणात नवी मुंबई व मुंबईमध्ये येत आहेत. राहण्याची सोय नसल्यामुळे उड्डाणपूल व मोकळ्या भूखंडावर आश्रय घेत आहेत. महापालिकेच्या रात्रनिवारा केंद्राचाही त्यांना लाभ होत नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे शहरात किमान ११ निवारा केंद्रे उभारणे आवश्यक आहे. पण सद्यस्थितीमध्ये एकच केंद्र असून तेही दुष्काळग्रस्तांसाठी गैरसोयीचे ठरत आहे.वाशिम, यवतमाळ व राज्यातील विविध जिल्ह्यांमधून दुष्काळग्रस्त नागरिक रोजगारासाठी मुंबईमध्ये येऊ लागले आहेत. सद्यस्थितीमध्ये नवी मुंबईमधील नेरूळ, सानपाडा व इतर विभागामध्ये हजारो नागरिक दाखल झाले आहेत. उड्डाणपुलाखाली, रेल्वे स्टेशन परिसर व इतर ठिकाणी जागा मिळेल तेथे शेतकरी व शेतमजुरांनी आश्रय घेतला आहे. रात्री या ठिकाणी मुक्काम करायचा व दिवसा नाक्यावर जाऊन काम शोधायचे असा सर्वांचा दिनक्रम आहे. सानपाडा पुलाखाली आश्रय घेतलेले नागरिक स्वयंपाक येथे करतात व झोपण्यासाठी जवळच्या पादचारी पुलाचा आधार घेत आहेत.वास्तविक महानगरांमध्ये आलेल्या बेघर नागरिकांसाठी महानगरपालिकांनी रात्र निवारा केंद्र सुरू करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. एक लाख लोकसंख्या असलेल्या परिसरामध्ये एक केंद्र उभारणे बंधनकारक आहे. नवी मुंबईची २०११ च्या जनगणनेप्रमाणे ११ लाख लोकसंख्या आहे. सद्यस्थितीमध्ये लोकसंख्या १५ लाखपेक्षा जास्त झाली असल्याचा अंदाज आहे. यामुळे शहरामध्ये ११ ते १५ रात्र निवारा केंद्रे उभारणे आवश्यक आहे.सद्यस्थितीत बेलापूरमधील जुन्या विभाग कार्यालयाच्या जागेमध्ये फक्त एकच केंद्र कार्यरत आहे. येथे ८० नागरिकांना आश्रय घेता येईल एवढी क्षमता आहे. पण २० ते २५ जणांनाच त्याचा लाभ होत आहे. पालिकेचे कर्मचारी बेघरांशी संवाद साधून त्यांना याविषयी माहिती देत आहेत. सिग्नलवर काम करणाऱ्यांना या केंद्रामध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्याला अपेक्षित यश आलेले नाही.दुष्काळग्रस्त नागरिकांना या केंद्राची पुरेशी माहिती नाही. याशिवाय केंद्रापासून रोजगाराचे ठिकाणी असलेले नाके दूर अंतरावर आहेत. नेरूळ, सानपाडा, तुर्भे रेल्वे स्टेशनच्या जवळ निवारा केंद्र असते तर त्याचा लाभ दुष्काळग्रस्तांनाही झाला असता. सद्यस्थितीमध्ये पुलाखाली व इतर ठिकाणी मुक्काम करण्यावाचून दुसरा पर्याय नसून त्या ठिकाणी महापालिका प्रशासनाने अतिक्रमण समजून त्रास देऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.बेलापूरमध्ये महानगरपालिकेने रात्रनिवारा केंद्र सुरू केले आहे. येथे ८० बेघरांना आश्रय घेता येऊ शकतो. जास्तीत जास्त नागरिकांनी या केंद्राचा लाभ घ्यावा यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. दुष्काळग्रस्त नागरिकांना केंद्रात प्रवेश हवा असेल तर त्यांनी संपर्क साधावा. शहरात अजून दोन केंद्रांचे काम सुरू आहे.- अमोल यादव, उपआयुक्त समाजविकास, नवी मुंबई महापालिका
दुष्काळग्रस्तांना नवी मुंबईतील रात्रनिवारा केंद्रांचाही लाभ नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 7:14 AM