कळंबोली : कडक ऊन आणि त्यामध्ये कमालीच्या पाणीटंचाईला पनवेलकरांना सामोरे जावे लागत आहे. एमजेपीच्या ढिसाळ नियोजनामुळे कळंबोली, नवीन पनवेलमध्ये गेल्या चार दिवसांपासून पाण्याची कमतरता भासत आहे. रहिवाशांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. त्यामुळे सिडको अधिकाऱ्यांना स्थानिक रहिवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.भोकरपाडा ते पनवेल या दरम्यानच्या जलवाहिन्या जुनाट झाल्या आहेत. त्यांना फुटीचे ग्रहण लागल्याने वारंवार शटडाउन घेतला जात आहे. त्याचबरोबर पाताळगंगा नदीत टाटा पॉवर कंपनी पाणी सोडते. तेच पाणी पनवेलकरांना पिण्यासाठी दिले जाते. मात्र, सुटीच्या दिवशी वीजनिर्मिती केंद्र बंद ठेवण्यात येत असल्याने पाणी नदीच्या पात्रात येत नाही. रविवारी त्यामुळे पाताळगंगा नदीत पाणी नसल्याने एमजेपीकडून पाणी मिळाले नाही. शनिवारी जलवाहिन्यांच्या दुरुस्तीकरिता शटडाउन घेण्यात आला होता. त्याचा परिणाम सोमवारी जाणवला. अतिशय कमी दाबाने पाणी सोडण्यात आले. मात्र, मंगळवारी भोकरपाडा येथे महावितरण कंपनीने मान्सनपूर्व कामाकरिता शटडाउन घेतल्याने दिवसभर वीज बंद होती. या कारणाने पनवेल आणि सिडको वसाहतींना पाणीपुरवठा झाला नाही. या कारणाने पनवेलसह कळंबोली, नवीन पनवेलमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली.रहिवासी पाण्यासाठी बादल्या आणि हंडे घेऊन फिरताना दिसले. काहींनी पिण्याकरिता दुकानातून मिनरल वॉटर घेतले. कार्यकारी अभियंता दिलीप बोकाडे, चंद्रहास सोनकुसरे यांनी टंचाईच्या ठिकाणी तात्पुरता उपाय म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. मात्र, पनवेल महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या दोनही अधिकाºयांनी मोबाइल बंद करून ठेवले त्यामुळे नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.सिडकोच्या घरातील रहिवाशांचे हालनवीन पनवेल, खांदा वसाहतीत सिडकोने उभारलेल्या इमारतीत पाण्याच्या टाक्यांची सोय नाही. त्यामुळे पाणी साठवणूक करता येत नाही, त्यामुळे रहिवाशांचे टंचाईच्या काळात हाल होत आहेत. नवीन पनवेल सेक्टर-१७मध्ये अतिशय भयानक परिस्थिती आहे. वरच्या मजल्यांना पाणीच जात नसल्याने अनेक ठिकाणी ज्येष्ठांना पाणी घरी घेऊन जावे लागत आहे. हीच स्मार्ट सिटी आहे का? असा सवाल माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी केला आहे.गेल्या काही दिवसांपासून कळंबोलीत पाणी येत नाही, त्यामुळे सर्व नित्यक्र म बिघडला आहे, स्वयंपाक करण्यापासून ते कपडे व इतर कामे करता येत नाहीत. पिण्याचे पाणीही विकत घ्यावे लागत आहे. नियमित कर भरूनही मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत. आम्हाला कोणी वाली आहे की नाही, असा प्रश्न पडत आहे.- मंगला भैरू पवार, गृहिणी, कळंबोलीएमजेपी, टाटा पॉवर आणि महावितरण यांच्यात समन्वय नसल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्याकडून कोणतीच माहिती मिळत नाही, त्यामुळे नियोजन करता येत नाही. त्यामुळे सिडकोला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. गुरुवारपासून पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल.- दिलीप बोकाडे, कार्यकारी अभियंता, सिडकोनवीन पनवेलमधील पीएल-६मध्ये गेल्या पाच दिवसांपासून पाण्याची अडचण आहे. अनेकांनी दोन ते तीन दिवस अंघोळ केलेली नाही. पाणी नसल्याने सर्वच कामे खोळंबली आहेत, मुलांना शाळेत सुट्ट्या आहेत म्हणून तरी ठीक आहे, नाही तर मोठी अडचण झाली असती.- संतोष सुतार, रहिवासी, नवीन पनवेल
पनवेल परिसराच्या घशाला कोरड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 2:51 AM