निवडणुकांमुळे शासकीय कार्यालयांत सामसूम
By Admin | Published: February 21, 2017 06:29 AM2017-02-21T06:29:34+5:302017-02-21T06:29:34+5:30
रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकरिता मंगळवारी मतदान होत आहे. त्या अगोदरच प्रशासनाने तयारी केली आहे.
अरूणकुमार मेहत्रे / कळंबोली
रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकरिता मंगळवारी मतदान होत आहे. त्या अगोदरच प्रशासनाने तयारी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक शासकीय कार्यालयात सामसूम असून कामे ठप्प झाल्याची ओरड आहे. नागरिकांनी विचारणा केली असता, निवडणूक झाल्याशिवाय रेंगाळलेली कामे पूर्ण होणार नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात शासकीय कार्यालये आहेत. त्यामध्ये महसूल, सार्वजनिक बांधकाम, पंचायत समिती, निबंधक, भूमिअभिलेख, सहाय्यक कामगार आयुक्त, सुरक्षा रक्षक मंडळ या व इतर शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे. निवडणुकीचे प्रशिक्षण तसेच इतर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असल्याने कित्येकांचे मूळ कार्यालयाकडे येणे कमी झाले. त्यापैकी काहींचा वेळ प्रशिक्षण आणि बैठकांमध्येच गेला, तर काही जण आपली नियुक्ती रद्द करून घेण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यामुळे सरकारी कार्यालयांत शांतता होती आणि आजही आहे. शासकीय कार्यालयात अनेक कामे रखडली आहेत. आचारसंहिता आणि मनुष्यबळ नसल्याचे कारण पुढे केले जात आहेत. प्रांत आणि तहसील कार्यालय गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. पंचायत समितीचीही तीच स्थिती आहे. शिधा पत्रिका, जमीन, विविध योजनेचा लाभ आदी अनेक कामे ठप्प झाले आहेत. निवडणूक कामांमुळे अनेक कार्यालयात वरिष्ठ अधिकारी नाहीत, बैठका नाहीत, वरिष्ठांकडून अहवाल मागितले जात नाहीत, विशेष म्हणजे काम घेऊन आलेल्या नागरिकांना आचारसंहितेचे कारण सांगून सहजासहजी परत पाठविता येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कामच राहिले नाही. जे कोणी कर्मचारी अत्यावश्यक सेवा किंवा महत्त्वाच्या टेबलवर नियुक्तीला आहेत, त्यांनाच फक्त काम असल्याचे दिसून येते.
कामकाज संथ
पनवेल शहरातील एरव्ही गजबजलेली कार्यालये जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमुळे सामसूम दिसत आहेत.फक्त तहसील आणि प्रांत कार्यालयात रेलचेल अधिक दिसून येत होती. तीही निवडणुकीच्या कामानिमित्तानेच, पंचायत समिती त्याचबरोबर इतर अनेक कार्यालये कर्मचाऱ्यांनाविना सुनेसुने दिसत आहेत.
६२ उमेदवारांचे भविष्य आज मतपेटीत
च्पनवेल तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ८ जागांसाठी २३ व पंचायत समितीच्या १६ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेच्या केळवणे व वडघर येथे शेका पक्ष व शिवसेनेच्या उमेदवारांत सरळ लढत होणार आहे. वावजे व नेरे येथे तिरंगी लढत सेना, भाजपा व शेका पक्षात होणार आहे. पाली देवदमध्ये चौरंगी लढत होणार असून, येथे भाजपा, शेका पक्ष, बहुजन समाज पार्टी व भारिप बहुजन समाज पार्टी या उमेदवारांमध्ये लढत होईल.
च्गव्हाणमध्ये सेना, भाजपा, शेका पक्ष व दोन अपक्ष अशी लढत होणार आहे. पंचायत समितीसाठी १६ जागांसाठी भाजपा १४, सेना ८, शेका पक्ष ११, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ४ व अपक्ष २ उमेदवार रिंगणात आहेत. चिंध्रण, नेरे, पाली देवद, पळस्पे, कोन, पोयंजे, करंजाडे, वडघर, केळवण व आपटा या १० ठिकाणी दुरंगी लढत, वावंजे, आदई, विचुंबे, गुळसुंदे व वहाळ या ५ ठिकाणी तिरंगी लढत व गव्हाणला चौरंगी लढत होणार आहे. पोयंजे, करंजाडे या दोन ठिकाणी भाजपाने माघार घेतली आहे. शेका पक्षाने ४ जागा आघाडीसाठी सोडल्या आहेत.
उरणमध्ये ११४ मतदान केंद्रे
च्जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी १७, पंचायत समितीच्या आठ जागांसाठी २६ अशा एकूण १२ जागांसाठी ४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. १२ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत ९६,९२७ मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये ४८,८०९ स्त्री तर ४८,११८ पुरुष मतदारांचा समावेश आहे. उरण तालुक्यात ११४ मतदान केंदे्र आहेत. यासाठी ५७५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
च्न्हावा-शेवा, मोरा सागरी पोलीस ठाणे आणि उरण पोलीस ठाणे अशा तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत विभागलेल्या ११४ मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच उरण परिसरात निर्भेळपणे मतदान करण्यासाठी ४०० पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. यामध्ये ८ पोलीस निरीक्षक, ४२ पोलीस उपनिरीक्षक आणि ३५० पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वपोनि राजेंद्र आव्हाड यांनी दिली.