कचराप्रकरणी हॉटेलचालकांना १ डिसेंबरची मुदत, पनवेल आयुक्तांनी साधला संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 04:44 AM2017-10-31T04:44:50+5:302017-10-31T04:48:20+5:30
पनवेल महानगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापनाबाबत ठोस पाऊल उचलले आहे. महापालिका आयुक्तांनी सोमवारी हॉटेलचालकांची बैठक बोलावून त्यांच्याशी संवाद साधला. आपला कचरा आपणच विल्हेवाट लावण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
कळंबोली : पनवेल महानगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापनाबाबत ठोस पाऊल उचलले आहे. महापालिका आयुक्तांनी सोमवारी हॉटेलचालकांची बैठक बोलावून त्यांच्याशी संवाद साधला. आपला कचरा आपणच विल्हेवाट लावण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. त्याचबरोबर याकरिता नेमक्या काय उपाययोजना करता येतील याबाबत माहिती देण्यात आली. १ डिसेंबरनंतर महापालिका आणि सिडको हॉटेलचा ओला कचरा उचलणार नसल्याचा इशारा यावेळी आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिला.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील दररोज चारशे ते साडेचारशे टन कचरा निर्माण होतो. त्यांची विल्हेवाट लावण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. चाळ येथील क्षेपणभूमी वादग्रस्त ठरली आहे. या ठिकाणी कचरा टाकण्यास स्थानिक ग्रामस्थ मनाई करीत आहेत. वहाळ येथे कचरा टाकण्यास विरोध होत आहे. त्याचबरोबर सिडको महापालिकेकडे ही सेवा वर्ग करून देण्याकरिता देव पाण्यात बुडून आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी घनकचरा व्यवस्थापनावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रशासनाने पाऊल उचलण्यास सुरूवात केली आहे. हॉटेल आणि मॉलमधून मोठ्या प्रमाणात ओला कचरा निर्माण होतो. महापालिकेने घेतलेल्या अंदाजानुसार हॉटेलमध्ये दररोज शंभर ते दीडशे किलो ओला कचरा तयार होतो. हा कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावण्याकरिता आरोग्य विभागाला घाम गाळावा लागतो तसेच कसरत करावी लागते. घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार हॉटेलचालक आणि मॉलवाल्यांनी आपल्या कचºयाची विल्हेवाट स्वत: लावणे क्र मप्राप्त आहे. त्यानुसार पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील हॉटेल मालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. मनपा आयुक्तांनी सोमवारी या संदर्भात बैठक बोलावली होती. संबंधितांना नियमावलीबाबत माहिती देण्यात आली. त्याचबरोबर पुढील आठवड्यात कचरा वर्गीकरण, बायोगॅस, कंपोस्ट खत निर्मिती करणारे प्रात्यक्षिकही दाखवण्यात येणार आहे.
महिला कचरावेचकाचा आधार
शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी शहरातील कचरावेचक महिलांचा महत्त्वाचा सहभाग आहे. संबंधित महिला कचरापेट्यातील प्लास्टीक, थर्माकोल यासारख्या पुनर्प्रक्रिया होवू शकणाºया वस्तू कचºयातून वेगळ्या करतात.
पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर येथील ३९० हॉटेल, मॉलमधील कचरा वर्गीकरण करण्यास महानगरपालिकेने ठरवून दिलेल्या कचरावेचक महिलांचा आधार घेता येणार आहे.