नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील एमआयडीसी भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तसेच पथदिवे नादुरुस्त असून अनेक ठिकाणी पथदिवे बसविण्यातच आलेले नाहीत. त्यामुळे या भागात कामासाठी येणाऱ्या नागरिकांची तसेच वाहनचालकांची गैरसोय होत असून विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील ऐरणीवर आला आहे.नवी मुंबई शहरात ठाणे-बेलापूर महामार्गाच्या शेजारील भागात शिरवणे एमआयडीसी क्षेत्र आहे. कंपन्यांमध्ये कामानिमित्त दररोज शेकडो मालवाहू जड अवजड वाहने ये-जा करतात. या वाहनांमुळे कमी कालावधीतच रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था होत आहे. महापालिकेच्या माध्यमातून एमआयडीसी भागातील काही रस्त्यांची कामे करण्यात आली असून काही रस्त्यांवर पथदिवे देखील बसविण्यात आले आहेत. परंतु यामधील अनेक पथदिवे गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त झाले आहेत त्यामुळे एमआयडीसीमधील रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. यामुळे कामानिमित्त ये-जा करणारे नागरिक आणि वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
नादुरुस्त पथदिव्यांमुळे एमआयडीसीतील रस्ते अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:29 PM