अरुणकुमार मेहत्रे -
कळंबोली : पनवेल महापालिका परिसरात गर्दी, संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन होत असल्याने दिवसेंदिवस कोरोना रुग्णात वाढ होत आहे. मार्च महिन्यापासून म्हणजे गेल्या १३ दिवसात १ हजार २२६ जणांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे, तर कामोठे, खारघर, कळंबोली शहर कोरोनाच्या हॉटस्पॉटवर आहेत. त्यामुळे पनवेल महापालिका परिसराची वाटचाल पुन्हा रेड झोनकडे होत असल्याचे दिसून येत आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत आहे. दररोज कोरोना रुग्ण सापडल्याचा आकडा दीडशेच्या जवळपास पोहोचला आहे. मार्च महिन्यापासून कोरोना रुग्णात वाढ झाली आहे. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. बाजारपेठेत आजतागायत गर्दी होत आहे. भाजी मंडई, दुकानातील गर्दी, हॉटेल, बसस्थानक, लोकल रेल्वे प्रवासासाठी करण्यात येणारी गर्दी, मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, या गोष्टी घातक ठरत आहेत. यामुळे पनवेल महापालिकेच्या चिंतेत वाढ झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील कोरोनाचा वर्षभराचा आढावा पाहिला तर शनिवारपर्यंत ३१ हजार २३७ जणांना कोरोना संसर्ग झाला आहे, तर ६५२ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मार्चपासून रुग्ण संख्येत वाढ होत आहे. यात कळंबोली, खारघर, कामोठे, नवीन पनवेल , पनवेल या परिसरात जास्त रुग्ण सापडत आहेत.. वाढत्या संख्येने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पनवेल महापालिकेकडून करण्यात येणारी कारवाई त्याचबरोबर रेल्वे लोकल सेवा तसेच बसस्थानक, बाजार समिती, भाजी मंडई येथील सोशल डिस्टन्सिंग तसेच मास्कचा अभाव, हॉटेल, ढाबे यांच्याकडून पाळण्यात न येणारे नियम कोरोना वाढीस कारण ठरत आहेत. याकडे पालिका प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे बनले आहे.
रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत पालिका क्षेत्रात संचारबंदी लागू असली तरी हॉटेल, रेस्टॉरंन्ट उशिरापर्यंत सुरु असतात. १ मार्च ते १३ मार्च २०२१ पर्यंतचा आढावा शहर सापडलेले रुग्ण खारघर ४२४ कामोठे २४८ कळंबोली १८४ नवीन पनवेल १६२ पनवेल १३४ खांदा कॉलनी ५४ तळोजा १०एकूण १२२६ आतापर्यंत मृत्यू ८
गेल्या वर्षभरात पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी अहोरात्र काम करून कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे. दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्याकरिता पालिका प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासंदर्भात कारवाई करत आहोत. पालिका परिसरातील शाळा बंद केल्या आहेत. दुकानदार, हॉटेल, बाजारपेठ, रहदारीच्या ठिकाणी वेळोवेळी सूचना करण्यात येत आहेत. नियमांचे पालन करण्यास सांगितले जात आहे. नागरिकाकडून याबाबत सहकार्याची अपेक्षा आहे. - सुधाकर देशमुख, आयुक्त, पनवेल महापालिका