बंद कारखान्यांमुळे औद्योगिक सुरक्षा धोक्यात, एमआयडीसीची झाली धर्मशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 05:07 AM2017-10-31T05:07:51+5:302017-10-31T05:08:01+5:30

ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांना घरघर लागली आहे. ७०० ते ८०० उद्योग बंद पडले आहेत. बंद पडलेल्या कारखान्यांमध्ये भंगार दुकानदारांसह इतर उद्योग करणाºयांनी अतिक्रमण करण्यास सुरवात केली आहे.

Due to industrial security threat due to closed factories, MIDC's dharamshala | बंद कारखान्यांमुळे औद्योगिक सुरक्षा धोक्यात, एमआयडीसीची झाली धर्मशाळा

बंद कारखान्यांमुळे औद्योगिक सुरक्षा धोक्यात, एमआयडीसीची झाली धर्मशाळा

Next

- नामदेव मोरे

नवी मुंबई : ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांना घरघर लागली आहे. ७०० ते ८०० उद्योग बंद पडले आहेत. बंद पडलेल्या कारखान्यांमध्ये भंगार दुकानदारांसह इतर उद्योग करणाºयांनी अतिक्रमण करण्यास सुरवात केली आहे. एमआयडीसीची धर्मशाळा झाली असून, त्याठिकाणी घातपाती कारवाया करणारेही आश्रय घेण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक वसाहतीमध्ये ठाणे बेलापूर एमआयडीसीचा समावेश होतो. जेएनपीटी बंदर, मुंबई - पुणे व गोवा महामार्ग जवळ असल्यामुळे याठिकाणी अनेक नामांकित उद्योजकांनी युनिट सुरू केले आहेत. यामध्ये अनिल अंबानी व मुकेश अंबानी यांच्या कंपन्यांचाही समावेश आहे. पूर्वी सर्वात मोठा केमिकल झोन या परिसरामध्ये होता. परंतु गत दहा वर्षांमध्ये हार्डेलियापासून सविता केमिकलपर्यंत अनेक महत्त्वाच्या कंपन्या बंद पडल्या. हजारो कामगार बेरोजगार झाले. केमिकल उद्योगांना घरघर लागलीच त्याबरोबर इतरही अनेक उद्योग विविध कारणांनी बंद पडत गेले. यापूर्वी महापालिकेच्या पर्यावरण अहवालामध्ये ६० टक्के उद्योग बंद असल्याची माहिती देण्यात आली होती. पालिकेची टक्केवारी खोटी असली तरी प्रत्यक्षात जवळपास १५ टक्के कारखाने बंद पडले आहेत. बंद कारखान्यांची संख्या ७०० ते ८०० च्या दरम्यान आहे. बंद उद्योग ही एमआयडीसी व नवी मुंबईसाठीही डोकेदुखी ठरू लागले आहे. शहरात भंगार माफियांनी धुमाकूळ सुरू केला आहे. कारखान्यांमधील लोखंड व इतर भंगार चोरणाºया टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. याशिवाय बंद कंपनीच्या प्रवेशद्वाराचे व आतमधील गेटचे टाळे तोडून त्या ठिकाणी मोठ्याप्रमाणात अतिक्रमण करण्यात येत असून हे अतिक्रमण रोखण्याचे आव्हान सुरक्षा व्यवस्थेसमोर उभे राहिले आहे.
बंद कंपन्यांचे खंडरात रूपांतर झाले असून त्यांना धर्मशाळेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. बोनसरी परिसरामधील तीन कंपन्यांमध्ये भंगाराचे गोडावून सुरू केले आहे. भंगार दुकानदारांनी याठिकाणी अतिक्रमण केले असल्याची शक्यता आहे. कारखान्यांच्या जागेवर अशाप्रकारे इतर उद्योग सुरू करता येत नाही याची माहिती असतानाही कोणीच याविषयी आवाज उठवत नाही. काही बंद कारखान्यांचा गोडावून म्हणून उपयोग केला जात आहे. वाटाणा व इतर कडधान्य पॅकिंग करण्यापासून कृषी व इतर उद्योगांची साठवणूक करण्यासाठी कारखान्यांचा उपयोग सुरू आहे. तुर्भेमधील एका कंपनीमध्ये चक्क शेळीपालन केले जात होते. त्या ठिकाणी आता लॉजिंग बोर्डिंग सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गणेश मंदिराजवळील पूर्वीच्या पी.जी. केमिकल कंपनीच्या जागेवर चक्क खानावळ सुरू करण्यात आली आहे. बंद कंपन्यांच्या सुरक्षेसाठी काहीही व्यवस्था नसून अशीच स्थिती राहिली तर भविष्यात अतिरेकीही या कंपन्यांमध्ये वास्तव्य करण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस, महापालिका व एमआयडीसी प्रशासनही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत.

एमआयडीसीतील वास्तव
- शिरवणेजवळील बोनसरीमधील कंपन्यांचा भंगार गोडावूनप्रमाणे वापर
- तुर्भे एमआयडीसी पोलीस स्टेशनजवळील एका कंपनीमध्ये लॉजिंग बोर्डिंग सुरू करण्याच्या हालचाली
- माझ्डा कंपनीसमोरील बंद कारखान्यामध्ये वाटाणा व इतर कृषी मालाची पॅकिंग सुरू
- प्लॉट नंबर डी ६५ मधील पी.जी. केमिकलमध्ये अनधिकृतपणे खानावळ सुरू
- रेश्मा डार्इंग कंपनी डी ५२ चा इमारतीचा वेअर हाऊसप्रमाणे वापर
- सनार्बे मयूर कोल्ड स्टोरेजसमोरील कंपनीच्या जागेवर झोपड्यांचे बांधकाम
- भूखंड क्रमांक ३७६ श्रीमान कंपनीही बंद पडली आहे.
- बावखळेश्वर मंदिराजवळील तीन कंपन्या बंद पडल्या आहेत.
- बंद कंपन्यांमध्ये जुगारी व गर्दुल्ल्यांचा अड्डा
- घातपाती व अतिरेकी कारवाया करणारे आश्रय घेण्याची भीती

भंगार माफियांचा धुमाकूळ
बंद कारखान्यांच्या सुरक्षेसाठी काहीही उपाययोजना नाही. परिणामी या कंपन्यांमधील भंगार चोरण्यासाठी अनेक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. रात्री बिनधास्त कारखान्यांमध्ये शिरून आतमधील लोखंडी साहित्य चोरी करून नेले जात आहे. यापूर्वी अशाच भंगार माफियांच्या हल्ल्यामध्ये हवालदार गोपाळ सैंदाने शहीद झाले होते. यानंतरही पोलीस प्रशासनाने भंगार व्यवसाय करणाºयांवर ठोस कारवाई केलेली नाही.

भूखंड परत ताब्यात घ्यावे
एमआयडीसीमधील अनेक कारखाने वर्षानुवर्षे बंद आहेत. शासनाने बंद असलेले कारखाने सुरू करण्यासाठी संबंधितांना प्रोत्साहित करावे व त्यानंतरही कारखाने सुरू होणार नसतील तर ते भूखंड ताब्यात घेवून त्यांची इतरांना विक्री करावी अशी मागणीही केली जात आहे.

शक्ती मिलप्रमाणे घटनेची भीती
मुंबईतील बंद पडलेल्या शक्ती मिल कंपनीमध्ये महिलेवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्येही अनेक कंपन्या बंद असून तेथे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी आश्रय घेतला आहे. सुरक्षेविषयी ठोस उपाययोजना झाल्या नाहीत तर भविष्यात एखादी दुर्घटना घडू शकते अशी भीतीही परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Due to industrial security threat due to closed factories, MIDC's dharamshala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.