सोयी-सुविधांअभावी कामोठेतील टपाल कार्यालयाला घरघर

By admin | Published: March 30, 2016 01:53 AM2016-03-30T01:53:03+5:302016-03-30T01:53:03+5:30

कामोठे वसाहतीत जवाहर इंडस्ट्रीमध्ये असलेल्या टपाल कार्यालयात सध्या अनेक गैरसोयी आहेत. त्यामुळे ग्राहकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अतिशय छोट्या जागेत

Due to lack of amenities, the post office in the Kamutha house will be surrounded | सोयी-सुविधांअभावी कामोठेतील टपाल कार्यालयाला घरघर

सोयी-सुविधांअभावी कामोठेतील टपाल कार्यालयाला घरघर

Next

- अरुणकुमार मेहत्रे,  कळंबोली
कामोठे वसाहतीत जवाहर इंडस्ट्रीमध्ये असलेल्या टपाल कार्यालयात सध्या अनेक गैरसोयी आहेत. त्यामुळे ग्राहकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अतिशय छोट्या जागेत या टपाल कार्यालयाचे काम सुरू आहे. पुरेशा सोयी-सुविधांअभावी कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी ग्राहकांना नवीन पनवेल येथील टपाल कार्यालयात जावे लागते.
ब्रिटिशांच्या काळात सुरू झालेली ही संदेशवहनाची यंत्रणा आजही सुरू आहे. स्वातंत्र्योत्तर काळात टपाल, तार हीच संपर्काची प्रमुख माध्यमे होती. याशिवाय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठविण्यासाठी मनिआॅर्डरची सुविधा होती, जी आजही प्रचलित आहे. या व्यतिरिक्त महत्त्वाची कागदपत्रे, पार्सल त्वरित पाठविण्यासाठी स्पीड पोस्ट सेवा उपलब्ध आहे. टपाल सेवेला पर्याय म्हणून अनेक कुरियर सेवा सुरू करण्यात आल्या असल्या तरी अजूनही विश्वासार्ह सेवा म्हणून ग्रामीणबरोबरच शहरी भागातही टपाल सेवेलाच प्राधान्य दिले जाते.
शासकीय पत्रव्यवहार, पार्सल, महत्त्वाची कागदपत्रे, बिल, पॅन कार्ड, वाहन परवाना, परमीट, पासपोर्ट, बँकांच्या नोटिसा किंवा माहिती पत्र, न्यायालयाच्या नोटिसा, समज, निकालपत्र हे आजही पोस्टानेच पाठवले जाते. जनतेसाठी इतक्या महत्त्वाच्या असलेल्या टपाल सेवेसाठी कामोठे वसाहतीकरिता स्वतंत्र टपाल कार्यालय नसल्याने त्याचा भार जवाहर इंडस्ट्रीजतील कार्यालयावर आहे.
टपाल खात्यात पत्रांची आवक-जावक जास्त असते. दररोज जवळपास ५०० हून अधिक टपाल येतात. पत्र, मनिआॅर्डर, रजिस्टर, पार्सल, पॅन कार्ड, टपालाचे वितरण करावे लागते. मात्र कामोठेतील टपाल कार्यालयाची जागा त्यासाठी अपुरी पडते. यासाठी किमान १००० चौरस मीटर जागेची आवश्यकता आहे. पत्र, कुरिअर, स्पीडपोस्टचे पार्सल ठेवले तर कर्मचाऱ्यांना बसण्याकरिता जागाच शिल्लक राहत नाही. त्यामुळे अनेक टपालांचे वितरण थेट नवीन पनवेल येथील मुख्य कार्यालयातून केले जात आहे. पोस्टमनची संख्याही कमी असल्याने सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडतो. त्यामुळे अनेकदा टपाल नागरिकांना उशिरा मिळत असल्याच्या तक्र ारी येत आहेत.
कार्यालयात फक्त दोनच कर्मचारी काम करीत असून त्यांच्यावर सुध्दा कामाचा भार आहे. येथे रजिस्टर पोस्ट, बुक पोस्ट, इंटीमेशन, आरडी बचत आदी कामे होतात. मात्र मनुष्यबळ कमी असल्याने कामाचा उरक होत नाही. टपालाची कागदपत्रे रिक्षाने नवीन पनवेलला पाठवले जातात त्याकरिता पोस्टाची गाडी येत नाही. अतिशय अडगळीच्या ठिकाणी असलेल्या या कार्यालयाकडे जाण्याकरिता कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे रिक्षा करूनच जावे लागते. रस्ते अतिशय खराब असल्याने रिक्षा सुध्दा तिथे जात नाही. त्यामुळे कित्येक जण कळंबोली किंवा खांदा वसाहतीतील पोस्ट कार्यालयात जावून काम करतात.

सिडको जागा देईना
कामोठेकरांची गैरसोय दूर व्हावी,याकरिता वसाहतीच्या मध्यवर्ती ठिकाणी जागा मिळावी याकरिता सिडकोकडे वारंवार पाठपुरावा केला जात आहे. मात्र अशा कामाकरिता सिडको काही जागा देत नसल्याने टपाल विभाग सुध्दा पाठपुरावा करून थकला आहे. वास्तविक पाहता सिडकोने याकरिता राखीव जागा ठेवणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

मद्यपींचा अड्डा
जवाहर इंडस्ट्रीजमध्ये असलेल्या पोस्ट कार्यालयात रहिवासी संकुल नाहीत. आजूबाजूला कारखाने असल्याने येथे कामगारवर्गाचा वावर जास्त आहे. त्यामुळे पोस्ट कार्यालय बंद झाल्यानंतर या ठिकाणी मद्यपी दारू पित असल्याचे आजूबाजूला पडलेल्या रिकाम्या बाटल्यावरून उघड झाले आहे.

कामोठे वसाहतीत सेक्टर २0 मध्ये भाडेतत्त्वावर पर्यायी जागा घेण्यात आली आहे. त्याचा करारनामा झाला आहे. लवकरच जवाहर इंडस्ट्रीजचे कार्यालय त्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात येईल. त्याचबरोबर सिडकोकडून जागा मिळावी याकरिता पाठपुरावा केला जात आहे.
- दीपाली कांबळे,
पोस्ट मास्टर, कामोठे

जवाहर इंडस्ट्रीजमधील पोस्ट कार्यालयाची स्थिती बिकट आहे. कॉलनीत टपाल कार्यालयासाठी सिडको आणि पोस्टाकडून समन्वय साधणे आवश्यक आहे
- धनश्री चव्हाण, रहिवासी.

टपाल, मनिआॅर्डर, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्रआदी महत्त्वाची कागदपत्रे टपालानेच येतात. मात्र टपालचे मुख्य कामकाज नवीन पनवेलहून होते.
- दादाभाऊ चौधरी, रहिवासी

Web Title: Due to lack of amenities, the post office in the Kamutha house will be surrounded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.