शाखा नसल्यानेच सेनेचा विस्तार खुंटला
By admin | Published: April 29, 2017 01:57 AM2017-04-29T01:57:17+5:302017-04-29T01:57:17+5:30
मुंबई, ठाण्याची सातत्याने सत्ता मिळविणाऱ्या शिवसेनेची नवी मुंबईमध्ये मात्र वाताहात सुरू आहे. पक्षाची ताकद समजल्या जाणाऱ्या
नामदेव मोरे /नवी मुंबई
मुंबई, ठाण्याची सातत्याने सत्ता मिळविणाऱ्या शिवसेनेची नवी मुंबईमध्ये मात्र वाताहात सुरू आहे. पक्षाची ताकद समजल्या जाणाऱ्या शाखांचे जाळे विणण्यात नेत्यांना अपयश आल्यानेच ही स्थिती निर्माण झाली आहे. वाशीतील मध्यवर्ती कार्यालयही अद्याप बुधाजी भोईर व राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते गणेश नाईक यांच्या नावावर आहे. नेरुळ, तुर्भे, ऐरोलीमधील शाखा वादग्रस्त ठरल्या असून अनेकांना टाळे लागले आहे. उर्वरित ठिकाणी सेना पदाधिकाऱ्यांना बसण्यासाठी व नागरिकांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी हक्काची शाखाच नसल्याने पक्षाची वाढ खुंटली आहे.
नवी मुंबईमधील शिवसेनानेते पक्षाचा विस्तार करण्याऐवजी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात गुंग झाले आहेत. पक्षात निष्ठावंत व उपरे असे दोन वर्ग पडले आहेत. याशिवाय प्रत्येक नेत्याने स्वत:चा वेगळा गट तयार करण्यास सुरुवात केली आहे. गटा-तटामध्ये विभागलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या मूळ रचनेचाच विसर पडला आहे. शिवसेनेमध्ये शाखा व शाखाप्रमुख यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. मुंबई व ठाण्यात प्रत्येक नोडमध्ये कायमस्वरूपी शाखा निर्माण करण्यात आल्या आहेत. शाखांचे जाळे घट्ट असल्याने व नागरिकांसह शिवसैनिकांची शाखांशी बांधीलकी असल्याने पदाधिकाऱ्यांनी जय महाराष्ट्र केला तरी संघटना खिळखिळी होत नाही. राज ठाकरे, नारायण राणे, छगन भुजबळ यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी पक्ष सोडल्यानंतरही मुंबई व ठाण्यामधील शाखा व शाखाप्रमुखांसह निष्ठावंत शिवसैनिकांच्या बळावर सत्ता टिकविण्यास व पुन्हा मिळविण्यात पक्षाने यश मिळविले; परंतु नवी मुंबईमध्ये शाखांची बांधणीच झाली नसल्याने गणेश नाईकांनी जय महाराष्ट्र केल्यानंतर २० वर्षांमध्ये अद्याप पक्षबांधणी करण्यात पक्षाला यश आले नाही.
शाखांचे जाळे नसल्यानेच नवी मुंबईमध्ये शिवसेना वाढत नाही. वाशीमध्ये पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय आहे; परंतु त्याची मालकी बुधाजी भोईर व माजी मंत्री गणेश नाईक यांच्या नावावर आहे. भोईर यांच्या निधनानंतर मालकी असलेले नाईक हेच असल्याने शाखा सेनेची असली तरी मालकी नाईकांचीच असल्याची स्थिती आहे. दोन दशकांमध्ये नाईकांकडून मध्यवर्ती कार्यालयाची मालकी मिळविण्यास पक्षाला अपयश आले आहे. हीच स्थिती ऐरोलीमधील शाखेची आहे. अनंत सुतार यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्यानंतर तेथील शाखेच्या मालकीचा वाद निर्माण झाला आहे. हा वाद न्यायालयात असल्याने एके काळी ऐरोलीची ताकद असलेल्या या शाखेला टाळे लावण्यात आले आहेत. तुर्भे स्टोअर्समधील शाखेमध्ये तळमजल्याची मालकी शिवसेनेकडे व वरील मजल्याची मालकी राष्ट्रवादी काँगे्रसच्या सुरेश कुलकर्णी यांच्याकडे अशी स्थिती आहे. उप जिल्हाप्रमुख के. एन. म्हात्रे यांच्या पक्षांतरानंतर नेरुळ गावामधील शाखाही बंद आहेत. जुन्या शाखा वादग्रस्त ठरत असताना उर्वरित ठिकाणी शाखाच नसल्याने शिवसैनिक निवडणुकीपुरत्याच शाखा तयार करत असल्याने शाखेविषयी नागरिकांमध्ये अस्था राहिलेली नाही.