देखभाल-दुरुस्तीअभावी सिडको वसाहतींतील उद्यानांची झाली दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 11:27 PM2019-12-15T23:27:52+5:302019-12-15T23:28:05+5:30
दिवे, हायमास्ट बंद : गवत वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव; सुविधा नसल्याने विरंगुळा केंद्र बंदावस्थेत; खेळणी मोडकळीस आल्याने अपघातांचा धोका
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंबोली : सिडको वसाहतीत तयार करण्यात आलेल्या उद्यानांची सध्या दुरवस्था झाली आहे. महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर सिडकोने देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे परिसरातील रहिवाशांची गैरसोय होत आहे.
नवीन पनवेल, कळंबोली वसाहत सिडकोने अनेक वर्षांपूर्वी निर्माण केल्या. त्या वेळी उद्यानांसाठी भूखंड आरक्षित ठेवण्यात आले होते. कालांतराने या ठिकाणी उद्याने विकसित करण्यात आली. सुरुवातीला यासाठी फक्त सिडकोची घरे असल्याने लोकसंख्या कमी होती. मात्र, आता मोठमोठे गृहप्रकल्प आल्याने लोकसंख्या कमालीची वाढली. तुलनेने उद्यान संख्या अपुरी आहे.
खारघरमध्येही सिडकोकडून उद्यान निर्माण करण्यात आली आहेत. मात्र, देखभाल दुरुस्तीअभावी त्यांची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी संरक्षण भिंती तुटलेल्या आहेत. काही उद्यानाला प्रवेशद्वार नाही, तर काही ठिकाणी उद्यानातील दिवे, हायमास्ट बंद अवस्थेत आहेत. जॉगिंग ट्रॅकही खराब झालेले आहेत.
पावसाळा संपल्यानंतरही येथील गवत छाटणी होणे आवश्यक होते. मात्र, तसे न झाल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. येथील झाडांचीही व्यवस्थित देखभाल केली जात नाही. कित्येक ठिकाणी लहान मुलांची खेळणी मोडली आहेत.
सिडकोने काही उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र बांधली आहेत. त्या ठिकाणीसुद्धा सुविधांचा अभाव दिसून येत आहे. काही केंद्र बंद अवस्थेत आहेत. कामोठे कॉलनीत उद्यानाकरिता राखीव असलेला
भूखंड अद्याप विकसित करण्यात आलेला नाही. या ठिकाणी डेब्रिज, कचरा टाकला जात असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. परिसरातील उद्यानांचे सुशोभीकरण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
नवीन पनवेल येथे उद्यानांची अवस्था बिकट
नवीन पनवेल, सेक्टर १२, १५ आणि १६ येथे सिडकोने अगोदर उद्यान विकसित केली आहेत. मात्र, देखभालीकडे लक्ष दिले नाही. याच कारणाने अनेक गोष्टींचा अभाव येथे दिसून येत आहे. महापालिका स्थापन झाल्यानंतर याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले.
सिडकोने सुरुवातीला उद्यान विकसित केले. अल्ट्रा मॉडर्न गार्डन म्हणून त्यावर कोट्यवधी रुपये खर्च झाला; परंतु ते मेंटेन ठेवण्याकरिता दुर्लक्ष झाले, हीच वस्तुस्थिती आहे. महापालिका स्थापन झाल्यानंतर याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे अनेक उद्यानांची दुरवस्था झाली. त्यांची दुरुस्ती करावी यासाठी सिडकोकडे पाठपुरावा सुरू आहे.
- संदीप पाटील, माजी नगराध्यक्ष, पनवेल
सिडको वसाहतीतील उद्यानाची हस्तांतर प्रक्रिया सुरू आहे. उद्यानाचे काही प्लॉट हस्तांतर करण्यात आले आहेत. महापालिकेला सद्यपरिस्थितीत असलेले उद्यान हस्तांतरित करण्यात येणार आहे. काही उद्यानातील दुरवस्था झाली आहे. त्यांचे काम चालू आहे, तसेच उद्यानासाठी लागणाऱ्या सुविधाही पुरवण्यात येत आहेत.
- सीताराम रोकडे, अधीक्षक, अभियंता सिडको