देवाळे तलावामुळे शहराच्या सौंदर्यात भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 04:45 AM2018-11-11T04:45:25+5:302018-11-11T04:46:02+5:30

लवकरच होणार लोकार्पण : कारंजासह जॉगिंग ट्रॅकचे बांधकाम

Due to the lake pond, the city's beauty will be filled | देवाळे तलावामुळे शहराच्या सौंदर्यात भर

देवाळे तलावामुळे शहराच्या सौंदर्यात भर

googlenewsNext

वैभव गायकर
पनवेल : महानगरपालिकेने देवाळे तलावाचे सुशोभीकरण केले आहे. १ कोटी ७५ लाख रुपये खर्च करून जॉगिंग ट्रॅक, कारंजे व इतर कामे केली आहेत, यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली असून, महिनाअखेरीस या कामाचे लोकार्पण होणार आहे. तलावाचे शहर म्हणून पनवेल शहराची ओळख आहे. देवाळे तलावासह कृष्णाळे, इस्रायली, लेंडाळे, वडाळे आदींचा समावेश आहे. या पाच तलावांवरूनच पनवेल शहराला पानवेल असे नाव पडले. कालांतराने पानवेल नावाचे रूपांतर पनवेल शहरात झाले.

‘तलावांचे सौंदर्य’ ही शहरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. पालिका मुख्यालयाजवळ असलेल्या देवाळे तलावाच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. आयुक्त गणेश देशमुख यांनी कंत्राटदाराला हे काम लवकरात लवकर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. पालिकेच्या महत्त्वाच्या विकासकांमांमध्ये या कामाचा समावेश असल्याने आयुक्त गणेश देशमुख या कामावर जातीने लक्ष ठेवून आहेत. विशेष म्हणजे, अगदी बारकाईने आयुक्त या कामाची माहिती घेत आहेत. सुमारे १ कोटी ७५ लाख निधी खर्चून या तलावात आकर्षक रंगबिरंगी कारंजे, ३५० मीटरचा जॉगिंग ट्रॅक, युरोपच्या धर्तीवर पथदिवे आदीचा यामध्ये समावेश आहे. देवाळे तलाव हे पालिकेच्या मुख्यालयाच्या समोरच असल्याने या कामामुळे मुख्यालयाच्या सौंदर्यातही भर पडणार आहे. पनवेल शहरातील रस्ते अरुंद असल्याने येथील रहिवाशांना सकाळी किंवा सायंकाळी शहरात फेरफटका मारता येत नाही, अशा अवस्थेत या तलावाच्या लोकार्पणानंतर शहरातील रहिवाशांना जॉगिंगसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध होणार आहे. तलावाच्या परिसरातील २२ अनधिकृत दुकानांना हटविण्याच्या दृष्टीनेही हालचाली सुरू आहेत. या या दुकानांमुळे तलावाच्या सौंदर्यात बाधा येणार असल्याने नोटिसादेखील बजावण्यात आलेल्या आहेत.
 

Web Title: Due to the lake pond, the city's beauty will be filled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.