घणसोलीत मलेरियामुळे महिलेचा झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 02:29 AM2018-07-19T02:29:32+5:302018-07-19T02:29:40+5:30
मुसळधार पावसाच्या बदलत्या हवामानामुळे नवी मुंबईत संशयित डेंग्यू, मलेरिया आणि हिवतापाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
नवी मुंबई : मुसळधार पावसाच्या बदलत्या हवामानामुळे नवी मुंबईत संशयित डेंग्यू, मलेरिया आणि हिवतापाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. उपचारासाठी नवी मुंबईतील महापालिका आणि खासगी रुग्णालयात रु ग्णांनी एकच गर्दी केली आहे. दोन दिवसांपासून हिवतापाने हैराण झालेल्या घणसोली गावातील सीमा शंकर पाटील (३३) या महिलेचा बुधवारी सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास ऐरोली येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला.
घणसोली गावात चिंचआळी येथे राहणाऱ्या सीमा पाटील गेल्या दोन दिवसांपासून हिवतापाने आजारी होत्या, म्हणून त्यांना मंगळवारी १७ रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास उपचारासाठी ऐरोली सेक्टर ८ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, त्यांच्यावर डॉ. संदीप मुळे उपचार करीत होते. मात्र त्यांना आज पहाटेच्या वेळेस अचानक ताप भरून शरीरातील रक्तपेशींचे प्रमाण घटल्याने श्वासोच्छ्वासाचा त्रास सुरू झाल्यामुळे सकाळी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक धनोज गपाट यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली. या प्रकारानंतर महापालिकेच्या घणसोली येथील नागरी आरोग्य केंद्रामार्फत वेळच्यावेळी धूर फवारणी, तसेच अळीनाशक फवारणी होत नसल्याबद्दल घणसोली गावातील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये पावसाळा सुरू झाल्यापासून तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होवू लागली आहे. डेंग्यू व मलेरियाचे रुग्णही आढळू लागले आहेत. महानगरपालिकेने औषध फवारणी सुरू केली असून नागरिकांनीही काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.