नवी मुंबई : माथाडी कामगार मतदानासाठी गावी गेल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा-बटाटा मार्केटमधील व्यवहार ठप्प झाले होते. फळ मार्केटमध्येही सकाळी चक्काजामची स्थिती निर्माण झाली होती. धान्यसह मसाला मार्केटमध्येही कामगार कमी असल्याने मालाची चढ-उतार करताना तारेवरची कसरत करावी लागत होती.सातारा, माढासह बारामती मतदारसंघामधील निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. सातारामधून कामगार नेते नरेंद्र पाटील निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघामधील जावली, वाई, कराड, पाटण व सातारामध्ये माथाडी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. निवडणुकीसाठी कामगारांनी गावी यावे, असे आवाहन नेत्यांनी केल्यामुळे मतदान असलेले सर्व कामगार सोमवारी रात्रीच गावाकडे रवाना झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक संख्या कांदा मार्केटमधील कामगारांची आहे. मतदानासाठी गावी जाणार असल्याचे कामगारांनी व्यापाऱ्यांना यापूर्वीच सांगितल्यामुळे आवक मागविण्यात आली नव्हती. दिवसभर कांदा, बटाटा व लसूणच्या २७ ट्रक व टेम्पोची आवक झाली आहे. कामगार नसल्यामुळे आलेला माल उतरवून घेता आलेला नाही. यापूर्वी मार्केटमध्ये शिल्लक मालाची विक्रीही करता आली नाही. ग्राहकांनाही निराश होऊन परत जावे लागले.भाजी मार्केटमधील आवक सुरळीत सुरू होती. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत ६३० वाहनांची आवक झाली होती. अनेक माथाडी कामगार गावी गेले असले तरी रोजंदारीवर काम करणाºया कामगारांकडून काम करून घेण्यात येत होते. फळ मार्केटच्या व्यवहारावरही परिणाम झाला होता. दिवसभरामध्ये ६७ हजार ४२५ पेटी आंब्याची आवक झाली. इतर फळांचीही समाधानकारक आवक झाली. कामगार कमी असल्यामुळे मालाची चढ-उतार करण्यासाठी वेळ लागत होता. सकाळी मार्केटमध्ये चक्काजामची स्थिती होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुरक्षा विभागाला तारेवरची कसरत करावी लागली. धान्य व मसाला मार्केटमध्येही कामगारांची संख्या कमी असल्यामुळे ग्राहकांना वेळेत माल पोहोचविता आला नाही.माथाडी कामगार मतदानासाठी गावी गेल्यामुळे कांदा-बटाटा मार्केटमधील व्यवहारावर परिणाम झाला होता. कामगार नसल्यामुळे मालाची चढ-उतार करता येत नव्हती. भाजी, फळ, मसाला व धान्य मार्केटमधील व्यवहार दिवसभर सुरू होते.- अनिल चव्हाण, सचिव, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीदुरुस्तीचे काम सुरूकामगार गावी गेल्यामुळे कांदा मार्केटमधील व्यवहार ठप्प झाले होते. यामुळे व्यापाऱ्यांनी गाळ्यांसमोरील धक्के व इतर दुरुस्तीचे काम सुरू केले होते. याशिवाय मोकळ्या पॅसेजची साफसफाईही करण्यावर लक्ष दिले होते. बाजार समिती प्रशासनानेही मार्केटची साफसफाई व इतर कामे करण्यावर लक्ष दिल्याचे पाहावयास मिळत होते.
माथाडी गावी गेल्याने कांदा मार्केटमधील व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:55 AM