खाणकामामुळे ओवे कॅम्पमधील घरांना तडे
By Admin | Published: January 11, 2016 02:10 AM2016-01-11T02:10:59+5:302016-01-11T02:10:59+5:30
कोयना प्रकल्पग्रस्तांचे १९६२ साली खारघरमधील ओवे गावात पुनर्वसन करण्यात आले. कालांतराने सिडकोने या परिसराचा ताबा घेतला असला तरी आजही ओवे कॅम्प ही वसाहत अनेक सुविधांपासून वंचित आहे.
वैभव गायकर, पनवेल
कोयना प्रकल्पग्रस्तांचे १९६२ साली खारघरमधील ओवे गावात पुनर्वसन करण्यात आले. कालांतराने सिडकोने या परिसराचा ताबा घेतला असला तरी आजही ओवे कॅम्प ही वसाहत अनेक सुविधांपासून वंचित आहे.
सिडकोने नवनवे नोड वसवले असून बांधकामाच्या गरजा लक्षात घेऊन याठिकाणी खाणकामाला परवानगी दिली आहे. मोठमोठे सुरुंग लावून स्फोट करण्यात येत असल्याने ओवे कॅम्पमधील रहिवासी भीतीच्या छायेत वावरत आहेत. घरांनाही तडे गेल्याने त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे. प्रशासनही याप्रकरणी डोळेझाक करीत असून त्यामुळे खाणकाम व्यावसायिकांवर वचक नसल्याचा आरोप परिसरातील रहिवासी करीत आहेत. ओवे कॅम्पची लोकसंख्या जवळपास २५०० इतकी आहे. सध्या तीन ते चार ठिकाणी खाणकाम सुरू आहे. गावात पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. खाणकामातून उत्खनन केलेला मालाची शाळा असलेल्या रस्त्यावरूनच वाहतूक सुरू असते. त्यामुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. शिवाय माती, दगड, मुरुम वाहून नेला जात असल्याने परिसरात धुळीचे साम्राज्य पसरते. परिणामी विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे.
दररोज ओवे गावातील खाणीत दोन ते तीन वेळा सुरुंग लावून स्फोट घडविले जातात. सुरुंग स्फोटामुळे लहान मुले, वयोवृध्दांना त्रास होतो. अनेकदा घरातील भांडी पडतात. त्यामुळे सरकारने याप्रकरणी लक्ष घालून या त्रासातून आमची सुटका करावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी जनाबाई रेवने यांनी केली आहे. खाणकाम व्यावसायिकांना वेळीच आवर घातला नाही तर भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करणार असल्याचे येथील रहिवासी राम जाधव यांनी सांगितले.