नवी मुंबई : संत गाडगेबाबा यांच्या आठवणी जपण्यासाठी महापालिकेने आयुक्त निवासाच्या टेकडीवर उद्यान विकसित केले आहे. फक्त ५ व २ रुपये तिकीट असल्यामुळे नियमित येथे गर्दी असते. पाच वर्षांत तब्बल ९ लाख नागरिकांनी उद्यानास भेट दिली आहे. पालिका प्रशासन मात्र उद्यानाच्या देखभालीकडे योग्य लक्ष देत नसून येथे येणाऱ्या नागरिकांना अत्यावश्यक सुविधाही मिळत नाहीत. नवी मुंबई महानगरपालिकेने शहरात जवळपास २०० उद्याने विकसित केली आहेत. प्रत्येक नोडमध्ये नागरिकांना चांगले उद्यान उपलब्ध करून देण्यात आले आहे. परंतु उद्यानांचा विकास करतानाही पक्षपात होत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. उच्चभ्रू नागरिकांची वस्ती असलेल्या परिसरात उद्यानांवर जास्त खर्च होत असून गरिबांच्या वसाहतीमधील उद्यानांकडे मात्र दुर्लक्ष होऊ लागले आहे. महापालिकेला संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानामध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्यानंतर मिळालेल्या पैशातून हे उद्यान विकसित केले आहे. ११ जानेवारी २०११ ला हे उद्यान सुरू करण्यात आले. शहरात प्रथमच उद्यानामध्ये प्रवेश करण्यासाठी तिकीट दर आकारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. प्रौढ नागरिकांसाठी ५ रुपये व १२ वर्षे वयापर्यंतच्या मुलांसाठी २ रुपये तिकीट ठेवण्यात आले. परंतु शहरात पहिलेच भव्य उद्यान असल्यामुळे व रेल्वे स्टेशनवरून पाच मिनिटा७त पोहोचता येत असल्यामुळे नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळू लागला. लहान मुले सुटी असली की पालकांना उद्यानाला भेट देण्याचा आग्रह करू लागली होती. नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाही पालिका प्रशासनाने उद्यानाच्या देखभालीकडे योग्य लक्ष दिले नाही. नोव्हेंबरपर्यंत टॉय ट्रेन बंदच होती. गत आठवड्यात सुरू केली आहे. राशी उद्यानामध्ये नागरिकांच्या माहितीसाठीचा फलकावरील मजकूर पुसला गेला आहे. सुरुवातीला बसविण्यात आलेल्या खेळण्यांमध्ये वाढ केलेली नाही. वंडर्स पार्कमध्ये ज्या पद्धतीने खेळण्यांच्या खाली रबराचे आवरण तयार केले आहे, त्यापद्धतीने या परिसरात काहीच उपाययोजना केल्या नाहीत. अॅम्पी थिएटर तयार केले आहे. परंतु त्याचा काहीही उपयोग केला जात नाही. धबधबे बंद आहेत. हिरवळ मोठ्या प्रमाणात आहे परंतु त्याचा योग्य उपयोग केला जात नाही. नागरिकांना घसरगुंडी व झोपाळ्याव्यतिरिक्त करमणुकीसाठी काहीच पर्याय नाही. तेवढी खेळणी तर प्रत्येक नोडमधील उद्यानांमध्येही बसविली आहेत. पाच वर्र्षांमध्ये महापालिकेने उद्यानामध्ये सुधारणा करणे आवश्यक होते. परंतु त्याकडे लक्ष दिलेले नाही. परिणामी उद्यानाची दुरवस्था होऊ लागली असून पूर्वीपेक्षा भेट देणाऱ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे.
टेकडीवरील उद्यानाकडे महापालिकेचे दुर्र्लक्ष
By admin | Published: November 15, 2015 12:14 AM