- मयूर तांबडेपनवेल : बिल भरले नाही म्हणून पनवेल पंचायत समिती कार्यालयातील तीन विभागांचा वीजपुरवठा महावितरणने दोन दिवसांपासून खंडित केला आहे.पनवेल पंचायत समिती कार्यालयात ग्रामपंचायत, शिक्षण विभाग, पाणीपुरवठा, कृषी विभाग, एकात्मिक बाल विकास प्रकल्प, आरोग्य विभाग, पशू संवर्धन विभाग यासह अनेक विभाग आहेत, त्यामुळे दिवसभर नागरिकांची मोठी रेलचेल असते. पंचायत समितीतील आरोग्य विभाग, पशू संवर्धन विभाग व एकात्मिक बाल विकास प्रकल्प या तिन्ही कार्यालयांसाठी एकाच मीटरवरून वीज देण्यात आलेली आहे. मात्र, या मीटरचे नोव्हेंबर २०१८ पासूनचे २६००० रुपये इतके वीज बिल थकलेले आहे. महावितरणकडून वारंवार वीज बिल भरण्याबाबत संबंधित विभागास सूचना दिल्या आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने महावितरणने येथील वीजपुरवठा खंडित केला आहे.वीज नसल्यामुळे कार्यालयातील पंखे, संगणक व इतर उपकरणे बंद आहेत. कामे होत नसल्याने नागरिकांना दोन दिवसांपासून परत जावे लागत आहे. विविध कामांसाठी नागरिक पंचायत समितीच्या कार्यालयात येतात. पशू संवर्धन, आरोग्य विभाग व एकात्मिक बाल विकास प्रकल्प या तिन्ही कार्यालयातील कामकाज एका विजेच्या मीटरवर चालविले जात आहे. सद्यस्थितीत हे मीटर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी (बीडीओ)च्या नावावर आहेत.पंचायत समिती कार्यालयातील वीजमीटरची जोडणी तात्पुरती खंडित करण्यात आली आहे. कार्यालयाकडून २६ हजार रु पयांची थकबाकी भरण्यात आलेली नाही.- किरण चौधरी, सहायक अभियंतावीज बिल थकीत असल्याने त्या त्या विभागाने वीज बिल भरावे.- धोंडू तेटगुरे, बीडीओ,पंचायत समिती, पनवेल
बिल न भरल्याने तीन विभागांचा वीजपुरवठा खंडित
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 3:57 AM