खड्ड्यांमुळे पावणे येथील पुलाची झाली चाळण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 11:38 PM2019-09-16T23:38:18+5:302019-09-16T23:38:24+5:30
ठाणे-बेलापूर मार्गावर पावणे येथील पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
नवी मुंबई : ठाणे-बेलापूर मार्गावर पावणे येथील पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असून वाहनांच्या लांब रांगा लागत आहेत.
शहरातील रस्त्यांवर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, तर रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सर्वसामान्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अशाच प्रकारातून ठाणे-बेलापूर मार्गावर पावणे येथे सातत्याने वाहतूककोंडीची समस्या भेडसावत आहे. तिथल्या मोठ्या नाल्यावरील पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
या खड्ड्यांमधून मार्ग काढत वाहन चालवताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिणामी त्याठिकाणी वाहनांची गती मंदावून पावणे येथील या पुलापासून ते अग्निशमन केंद्रापर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. याचा परिणाम तिथल्या सिग्नलच्या यंत्रणेवर होत असून पादचाऱ्यांनाही रस्ता ओलांडणे कठीण होत आहे. तर काही खड्डे खोलवर पडले असल्याने त्याठिकाणी पुलाला भगदाड पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावर दररोज मोठ्या संख्येने वाहनांची ये- जा सुरू असते. अशातच तिथल्या उड्डाणपुलामुळे त्याखालील रस्ता अरुंद झाला आहे. तर सदर पूल अनेक वर्षे जुना असून सातत्याने त्यावर खड्डे पडत आहेत. यामुळे त्याठिकाणी खड्ड्यांमुळे एखादी दुर्घटना घडल्यास जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही.