मधुकर ठाकूरउरण : वाढते औद्योगिकीकरण, प्रचंड प्रमाणात होत असलेले मातीचे भराव, मॅन्ग्रोव्हजची कत्तल आणि रासायनिक घातक प्रकल्पांमुळे उरण तालुक्यातील पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात -हास झाला आहे. मात्र याबाबत उपाययोजना करण्याकडे, संबंधितांवर कारवाई करण्याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस प्रदूषणाची समस्या गंभीर होत असून आरोग्याच्या व्याधी बळावत आहेत.जेएनपीटीसह इतर खासगी बंदरांमुळे विविध कंपन्या, रासायनिक प्रकल्प, अवजड वाहनांमुळे वाहतूककोंडी, अपघाचे प्रमाण वाढत आहे. याशिवाय माल साठवणुकीची शेकडो गोदामे उरण तालुक्यात उभी राहत आहेत. विकासकामांच्या नावाखाली समुद्र, खाडीकिनारी आणि मोकळ्या परिसरात दगड-मातीच्या भरावामुळे पर्यावरणाची प्रचंड हानी होत आहे. समुद्रातील भरावामुळे पाणी पातळी वाढल्याने किनाऱ्यालगतच्या गावांतील बांध-बंदिस्ती उद्ध्वस्त करून समुद्राचे पाणी गावागावांत शिरू लागले आहे.नवी मुंबई सेझ, जेएनपीटी सेझ प्रकल्पांसाठी झालेल्या भरावामुळे तर गावांपासून समुद्र, खाड्यांपर्यंत असलेले पावसाळी पाण्याचा निचरा करणारे नैसर्गिक नाले बुजले गेले आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने ठिकठिकाणी पाणी साचून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय दगड-मातीच्या भरावामुळे स्थलांतरित आणि विविध स्थानिक जलचर पक्ष्यांची वास्तव्याची ठिकाणे नष्ट झाली आहेत. भरावासाठी डोंगर, टेकड्या भुईसपाट करण्यात आल्याने परिसरातील पशू-पक्ष्यांचे स्थलांतरही होऊ लागले आहे.उरण तालुक्यात उभारण्यात आलेल्या धोकादायक तसेच अत्यंत ज्वालाग्राही रासायनिक प्रकल्पांमुळे दूषित पाणी समुद्रात आणि खाड्यांत मिसळत आहेत. त्यामुळे जल, वायुप्रदूषणातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या जलप्रदूषणामुळे परिसरातील पारंपरिक मासेमारी पुरती धोक्यात आली आहे. विविध प्रकल्पांच्या उभारणीसाठी खारफुटीची बेसुमार कत्तल करण्यात येत असल्याने जैवविविधता नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे.पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात होणारा ºहास आणि वाढत्या प्रदूषणाविरोधात अनेक तक्रारी केंद्रीय पर्यावरण, प्रदूषण नियंत्रण विभागाकडे सातत्याने करण्यात येत आहेत. काही पर्यावरणवाद्यांनी प्रदूषणाच्या समस्येबाबत न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली आहे. मात्र तरीही संबंधित विभागाकडून दिरंगाई होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.>कारवाईबाबत उरण परिसरातील औद्योगिक कंपन्या, प्रकल्प आमच्याच अखत्यारीत येतात. मात्र वाढत्या प्रदूषणाविरोधात कोणत्या प्रकारची आणि कशी कारवाई केली केली जाते, याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी राहुल मोटे यांच्याकडे विचारणा केली असता, माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली.>उरण तालुक्यातील प्रदूषणाच्या समस्येबाबत आलेल्या तक्रारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे खातरजमा करून घेण्यासाठी पाठविण्यात येतात. मात्र त्यांनी केलेल्या कारवाईचा तपशील तहसील कार्यालयाला दिला जात नाही.- भाऊसाहेब अंधारे,तहसीलदार, उरण
प्रदूषणामुळे उरणकरांचा जीव गुदमरला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2020 11:51 PM