पावसामुळे कळंबोलीत बत्ती गुल
By admin | Published: June 14, 2017 03:15 AM2017-06-14T03:15:15+5:302017-06-14T03:15:15+5:30
इन्फ्राच्या माध्यमातून कोट्यवधींची कामे करूनही पनवेल परिसरातील वीज वितरणचे व्यवस्थापन पहिल्याच पावसात फोल ठरले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंबोली : इन्फ्राच्या माध्यमातून कोट्यवधींची कामे करूनही पनवेल परिसरातील वीज वितरणचे व्यवस्थापन पहिल्याच पावसात फोल ठरले आहे. सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसात कळंबोलीतील महावितरणची यंत्रणा कोलमडून पडली. त्यामुळे मध्यरात्रीपर्यंत बहुतांश भागातील वीज गायब झाली, तर मंगळवारी सकाळी तीन तास बत्ती गुल होती. त्यामुळे कळंबोलीकरांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.
सिडको वसाहतीत दिवसागणिक लोकवस्ती वाढत चालली आहे. त्याच प्रमाण वीजजोडण्यांची संख्या वाढत आहे. ग्राहकांच्या वाढत्या संख्येच्या विचार करता अनेक सुधारणा अपेक्षित असताना त्या केवळ कागदावरच आहेत. त्याचबरोबर एखाद्या वेळी वीजपुरवठा खंडित झाला तरी त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करणे क्रमप्राप्त आहे. सिडको वसाहतीत वीजगळती व थकबाकीचे प्रमाण कमी आहे. मात्र तरीही नियमित वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळत नाही. बत्ती गुल होणे ही नित्याचीच बाब झाली आहे.
पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत रहावा याकरिता महावितरणने विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. मान्सूनपूर्व कामांसाठी उन्हाळ्यात पनवेल परिसरात दिवसभर शटडाऊन घेतला जात होता. मंगळवार तर महावितरणचा दुरूस्तीचा हक्काचा वार त्याचबरोबर मान्सूनपूर्व कामाच्या नावाखाली ग्राहकांना घामाघूम केले जात होते. मात्र त्याचा काही फायदा झाला नसल्याची प्रचिती सोमवारी कळंबोलीतील वीजग्राहकांना आली. या नोडमध्ये रात्री नऊ वाजता वीजपुरवठा खंडित झाला तो मध्यरात्री सुरळीत झाला.
मंगळवारीही सकाळी साडेसहा वाजता गुल झालेली बत्ती दहा वाजता पूर्ववत झाली. यामुळे रहिवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. यासंदर्भात सहाय्यक कार्यकारी अभियंता ए. व्ही. पवार यांच्याशी संपर्क साधला असता तो होवू शकला नाही.
विजेच्या प्रश्नावर सेना आक्र मक
ग्राहकांकडून नियमित वीज बिल भरण्याची अपेक्षा केली जाते. त्याचप्रमाणे सुरळीत व अखंडित वीजपुरवठा व्हावा मिळणे त्यांचा हक्क आहे. त्यानुसार योग्य उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी शिवसेनेच्या वतीने पनवेल विधानसभा संघटक दीपक निकम यांनी केली आहे, अन्यथा ग्राहकहितवर्धक भूमिका घेवून शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्याची येईल असा इशारा मंगळवारी निकम यांनी दिला. या संदर्भात पक्षाच्या वतीने कळंबोली उपविभागीय कार्यालयात पत्र देण्यात आले.