पावसामुळे शहरात तापाचे रुग्ण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 03:07 AM2018-07-18T03:07:05+5:302018-07-18T03:07:41+5:30
मुसळधार पावसाचे दुष्परिणाम शहरात जाणवायला सुरुवात झाली आहे.
नवी मुंबई : मुसळधार पावसाचे दुष्परिणाम शहरात जाणवायला सुरुवात झाली आहे. तापाचे रुग्ण वाढू लागले असून, पावसाळा सुरू झाल्यापासून मनपा क्षेत्रामध्ये डेंग्यूचे २६ रुग्ण आढळले आहेत. ३० जणांना मलेरिया व सहा जणांना टायफॉइड झाल्याचे निदर्शनास आले आहे. रुग्णालयांमधील गर्दी वाढली असून, साथ अधिक पसरू नये, यासाठी महापालिकेने धुरीकरण व औषध फवारणीचे प्रमाण वाढविले आहे.
नवी मुंबईसह पनवेल परिसराला पावसाने झोडपले आहे. महापालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत २०८४ मिलीमीटर एवढी पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढत आहे. डास व पावसात भिजल्यामुळे शहरात तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयामध्ये रोज ११०० ते १२०० रुग्णांची नोंद होत असते. मागील काही दिवसांमध्ये बाह्य रुग्ण विभागामध्ये सरासरी १५०० रुग्णांची नोंद होऊ लागली असून, उपचारासाठी येणाऱ्यांमध्ये तापाच्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. महापालिकेचे ऐरोली, नेरुळ माताबाल रुग्णालय व २२ आरोग्य केंद्रांमध्येही तापाच्या रुग्णांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. खासगी रुग्णालयांमध्येही गर्दी वाढू लागली आहे. पालिका क्षेत्रामध्ये कावीळ, मलेरिया, डेंग्यू, टायफॉइडचे रुग्ण मागील ४५ दिवसांमध्ये वाढले असल्याची माहिती कोपरखैरणेमधील डॉक्टर प्रकाश शेंडगे यांनी ‘लोकमत’ला दिली.
महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये जानेवारी ते जुलै दरम्यान ५२ हजार २३१ जणांची रक्ततपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत डेंग्यूच्या २६ रुग्णांची महापालिकेकडे नोंदणी झाली आहे. डेंग्यूसदृश तापाचे शेकडो रुग्ण आढळून आले आहेत. मलेरियाचेही रुग्ण आढळून आले आहेत. साथीचे आजार वाढू नयेत, यासाठी महापालिकेने शहरात जनजागृती मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून आतापर्यंत तीन लाख १६ हजार घरे, कार्यालये व इतर वास्तूंच्या परिसरामध्ये पाहणी करण्यात आली आहे. डासअळी उत्पत्ती होईल, अशा सहा लाख ५६ हजार ९७२ ठिकाणांची पाहणी केली असता, ११०० ठिकाणी डासांची उत्पत्ती झाल्याचे आढळून आले आहे. डासांची उत्पत्ती आढळलेल्या ठिकाणीही औषध फवारणी करण्यात आली आहे. पाऊस थांबल्यानंतर रुग्ण संख्येत अजून वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. आवश्यक त्या ठिकाणी धूर फवारणी केली जात आहे. पथनाट्याच्या माध्यमातूनही जनजागृती केली जात आहे.
- दयानंद कटके,
वैद्यकीय अधिकारी, महापालिका
>महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या उपाययोजना
प्रत्येक आठवड्याला डास अळीनाशक फवारणी व बंद गटारातून धुरीकरण केले जात आहे.
घरोघरी जाऊन व मनपा रुग्णालयांमध्ये मोफत रक्ततपासणी केली जात आहे.
गप्पी मासे डासांच्या अळ्या खातात, यामुळे ज्या ठिकाणी पाणी साचले आहे अशा ठिकाणी गप्पी मासे सोडले जात आहेत.
डेंग्यू व मलेरियाचे रुग्ण आढळल्यास परिसरातील १०० घरांमधून ताप सर्वेक्षण, डास शोधण्याची मोहीम राबविली जात आहे.
>नागरिकांनी घ्यावयाची काळजी
घरांमध्ये व घराभोवती पाणी साचू देऊ नये.
प्लॅस्टिक कागद, ताडपत्री यामध्ये पाणी साचू देऊ नये.
पाणी साठविण्याचे भांडी व टाक्या बंदिस्त कराव्या व आठवड्यातून एक दिवस स्वच्छ करून कोरडे करून ठेवावे.
घरांमधील फुलदाण्या, कुंड्यांखालचे ट्रे,
फ्रीज, डिफ्रॉस्ट ट्रे, एसी डक्ट, फेंगशुईमध्ये साचलेले पाणी किमान दोन दिवसांनी बदलावे.
भंगार साहित्य, टायर्स इत्यादी नष्ट करावे, त्याचा साठा करून ठेवू नये.
काळजी न घेतल्यास कारवाई
महानगरपालिका साथीचे आजार पसरू नये यासाठी जनजागृती करत आहे. धुरीकरण व औषध फवारणी केली जात आहे. नागरिकांनीही काळजी घ्यावी व घरामध्ये डासांची उत्पत्ती होऊ नये याविषयी काळजी घेणे आवश्यक आहे. या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास व घरासह इमारतीमध्ये डासांची उत्पत्तीस्थाने आढळल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ अनुसूची ड प्रकरण १४ कलम १५ अन्वये कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
महापालिकेला माहिती द्यावी
नागरिकांना मलेरिया, संशयित डेंग्यू रुग्ण आढळल्यास जवळच्या महानगरपालिका रुग्णालयास त्वरित माहिती द्यावी आणि रुग्ण संशोधन कार्यवाहीसाठी आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाºयांना व फवारणी कामगारांना सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
साथ नियंत्रणात तरीही
काळजी घ्यावी
शहरात तापाचे रुग्ण वाढले आहेत. काही प्रमाणात डेंग्यू, मलेरिया व इतर आजारांचे रुग्णही आढळू लागले आहेत. यानंतरही साथ नियंत्रणामध्ये असल्याचा दावा महानगरपालिकेने केला आहे. पाऊस उघडल्यानंतर रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे.