पावसामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांचीही तारांबळ; मतदानाला फटका?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 12:30 AM2019-10-21T00:30:51+5:302019-10-21T00:31:15+5:30
शहरात १२१ मतदान केंद्र मैदानात उभारली
नवी मुंबई : शहरात दोन दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू आहे. पावसामुळे मतपेटी मतदान केंद्रावर घेऊन जाताना कर्मचाऱ्यांचीही तारांबळ उडाली. ऐरोलीसह बेलापूरमध्ये १२१ मतदान केंद्र मैदानात उभारण्यात आली आहेत. तेथे पावसाचे पाणी आत येणार नाही, असे तंबू लावले आहेत. तरीही पाऊस जास्त झाला तर मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरामध्ये दोन दिवस सातत्याने पाऊस पडत आहे. रविवारीही दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. नेरुळमधील आगरी कोळी भवनमधून बेलापूर मतदार संघातील कर्मचाºयांना मतपेटी व इतर साहित्यांचे वितरण करण्यात आले. ऐरोली मतदार संघामधील कर्मचाºयांना सरस्वती विद्यालयामधून साहित्य वाटप केले. कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना होतानाही त्यांना तारेवरची कसरत करावी लागली. साहित्य भिजू नये, यासाठी कर्मचाºयांकडून काळजी घेतली जात होती. पाऊस असाच सुरू राहिला तर त्याचा फटका मतदानाला बसण्याची शक्यता आहे.
ऐरोलीमध्ये ५६ व बेलापूरमध्ये ६५ ठिकाणी मैदानामध्ये मतदान केंद्र उभारली आहेत. दिव्यांगांची गैरसोय होऊ नये यासाठी ही काळजी घेण्यात आली आहे. मैदानामधील केंद्रांवर मंडप टाकण्यात आला नाही. पावसाचे पाणी आत जाऊ नये याची काळजी घेण्यात आली आहे. पाऊस पडलाच तर मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे निवडणूक विभागासह, सामाजिक कार्यकर्त्यांनीही पाऊस पडला तरी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी काळजी घेण्यात आली आहे.