नवी मुंबई : वाशी खाडीपुलाच्या मुंबईकडे जाणाऱ्या मार्गाच्या दुरुस्ती कामामुळे सदर मार्गावर वाहतूककोंडी झाली होती. रविवारी दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत हे काम सुरू होते. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांच्या सुमारे दोन किलो मीटर रांगा लागल्या होत्या.सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सायन-पनवेल मार्गावरील वाशी खाडीपुलाच्या दुरुस्तीचे काम रविवारी हाती घेण्यात आले होते. पुलावरून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर हे काम सुरू होते. पुलाच्या दोन भागांना जोडणाऱ्या लोखंडी पट्टीत दुरुस्तीची गरज होती. यानुसार बांधकाम विभागाने रविवारचा दिवस साधून दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. दुपारी १२ वाजल्यापासून ते ४ वाजेपर्यंत त्या ठिकाणी हे काम सुरू होते. त्याकरिता वाहने एकाच लेनमधून सोडली जात होती. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांच्या सुमारे दोन किलो मीटरपर्यंत लांब रांगा लागल्या होत्या. यामध्ये शहराबाहेरून येणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले. इतर दिवशी पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्यास, मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीची समस्या उद्भवली असती. यामुळे सुट्टीचा दिवस साधून सार्वजनिक बांधकाम विभागाने रविवारी या कामाला सुरुवात केली; परंतु मुंबई-पुणे या दोन शहरांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्यामुळे त्यावरून सतत मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू असते. परिणामी, रविवार असूनही पुलाच्या दुरुस्तीकामामुळे त्या ठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. यामुळे अपघाताची अथवा इतर गंभीर दुर्घटना घडू नये, याकरिता पुरेपूर खबरदारी घेतल्यावर वाशी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश बापशेट्टी यांनी सांगितले. पुलाचे सुधारकाम सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत वाहतूक पोलीस त्या ठिकाणी कार्यरत होते. अखेर सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पुलाचे दुरुस्तीकाम संपल्यानंतर काही वेळाने वाहतूक सुरळीत झाली. (प्रतिनिधी)
वाशी खाडीपुलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे वाहतूककोंडी
By admin | Published: February 13, 2017 5:15 AM