उघड्या नाल्यातून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे नागरिक हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 12:06 AM2018-10-25T00:06:10+5:302018-10-25T00:06:20+5:30
सीवूड, जुईनगर भागांत एमआयडीसीचे सांडपाणी प्रक्रि या न करताच नाल्यात सोडले जात असल्याने या पाण्याला दुर्गंधी येत आहे.
नवी मुंबई : सीवूड, जुईनगर भागांत एमआयडीसीचे सांडपाणी प्रक्रि या न करताच नाल्यात सोडले जात असल्याने या पाण्याला दुर्गंधी येत आहे. नाल्यांची स्वच्छता केली जात नसल्याने, तसेच बदललेल्या वातावरणामुळे परिसरात डासांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत असून, ते दुर्गंधीने हैराण झाले आहेत. पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
एमआयडीसीमधील कंपन्यांचे सांडपाणी खाडीकडे वाहून नेण्यासाठी शहरात विविध ठिकाणी नाले बनविण्यात आले आहेत. या सांडपाण्यावर प्रक्रि या न करता, दूषित पाणी सोडण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या नाल्यांची स्वच्छता झाली नसल्याने नाल्यात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला असून, नाल्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर झाडे-झुडपे वाढली आहेत. तसेच गाळ साचल्याने सांडपाणी साचून राहत आहे. नाल्यात अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यावर विशिष्ट तवंग निर्माण झाला असून, दुर्गंधीबरोबर डासांचे प्रमाणही वाढले आहे. या उघड्या नाल्यामुळे सीवूड, जुईनगर, सानपाडा भागातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून, डेंग्यू, मलेरिया अशा आजारांना सामोरे जावे लागत आहे. कंपन्यांनी सांडपाण्यावर प्रक्रि या करून नाल्यात सोडणे बंधनकारक असताना, अनेक कंपन्या रसायन मिश्रीत सांडपाणी प्रक्रिया न करताच नाल्यात सोडत आहेत. त्यामुळे पर्यावरणावर आणि नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. सदरच्या नाल्यांचे बांधकाम करून बंदिस्त करण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे. नेरु ळ भागातून सीवूडकडे जाणाºया नाल्याचे काही प्रमाणात बांधकाम करण्यात आलेले आहे; परंतु अर्धवट बांधकाम झालेल्या नाल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेने याकडे लक्ष द्यावे आणि नाल्याची स्वच्छता करावी, तसेच सांडपाण्यावर प्रक्रि या न करता सांडपाणी थेट नाल्यात सोडणाºया एमआयडीसीतील कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.