नवी मुंबई : सीबीडीमधील दुर्गामाता नगरमध्ये उघड्या मीटर बॉक्सला हात लागून सूरज अविनाश ढवळे (२ वर्षे) या मुलाचा मृत्यू झाला. मीटरची नोंद घेण्यासाठी आलेल्या कर्मचा-यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असून याविषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.दुर्गामाता नगरमध्ये दोन दिवसांपूर्वी मीटरची नोंद घेण्यासाठी कर्मचारी आले होते. नोंद पूर्ण झाल्यानंतर मीटर बॉक्सचे झाकण लावणे आवश्यक होते. परंतु कर्मचाºयांनी योग्य काळजी घेतली नाही. मीटर बॉक्सचे झाकण उघडेच ठेवले. बुधवारी चार वाजण्याच्या सुमारास या परिसरामध्ये राहणारा सूरज अविनाश ढवळे हा दोन वर्षांचा मुलगा खेळत मीटर बॉक्सकडे गेला. विद्युत वायरला हात लागल्याने त्याला शॉक लागला व मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महावितरणच्या वतीने मीटरची नोंद घेण्यासाठी आलेल्या कर्मचाºयांनी योग्य काळजी घेतली असती तर ही घटना घडलीच नसती असे मत व्यक्त केले जात आहे. या घटनेची गांभीर्याने चौकशी करण्यात यावी व जर कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर योग्य कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शॉक लागून मुलाचा मृत्यू, सीबीडीमधील दुर्गामाता नगरमध्ये असंतोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 2:43 AM