सहा मतदारसंघ संपुष्टात

By Admin | Published: September 30, 2016 04:04 AM2016-09-30T04:04:00+5:302016-09-30T04:04:00+5:30

पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेमुळे रायगड जिल्हा परिषदेतील ६२ मतदार संघातील सहा मतदार संघ जणू संपुष्टातच आले आहेत. सहापैकी पाच मतदार संघावर शेकापचे

Due to six constituencies | सहा मतदारसंघ संपुष्टात

सहा मतदारसंघ संपुष्टात

googlenewsNext

- आविष्कार देसाई,  अलिबाग
पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेमुळे रायगड जिल्हा परिषदेतील ६२ मतदार संघातील सहा मतदार संघ जणू संपुष्टातच आले आहेत. सहापैकी पाच मतदार संघावर शेकापचे तर, एका मतदार संघावर काँग्रेसचे असणारे प्राबल्यही नवीन मतदार संघाच्या निर्मितीमध्ये पुसले जाणार आहेत. दिग्गजांना नवीन मतदार संघाचा शोध घेतानाच नव्याने निर्माण होणाऱ्या मतदार संघात आपापल्या पक्षाची ताकद वाढविण्यासाठी मतदारांची बांधणी करावी लागणार आहे.
पनवेल तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण १० मतदार संघ आहेत. त्यापैकी आठ जागा शेकापकडे, तर दोन जागा या काँग्रेसच्या ताब्यात आहेत. पनवेल महानगर पालिकेत सहा मतदार संघ जाणार आहेत. मतदार संघाची पुनर्रचना झाल्यावरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
रायगड जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबलावर नजर टाकल्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडे २० जिल्हा परिषद सदस्य आहेत, तर कर्जत,रोहा, तळा, माणगाव, म्हसळा आणि श्रीवर्धन अशा सहा पंचायत समित्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खिशात आहेत. शेकापकडे १९ जिल्हा परिषद सदस्य आहेत. पंचायत समितींचा विचार केल्यास त्यांचा आकडा हा पाच आहे. त्यामध्ये अलिबाग, पेण, पनवेल, मुरुड आणि सुधागड-पाली या पंचायतींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेकडे १४ सदस्य संख्या आहे, तर पोलादपूर, उरण, महाड आणि खालापूर या चार पंचायतीवर भगवा फडकत आहे. काँग्रेसच्या ताब्यात एकही पंचायत समिती नाही.
राजकीय समीकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप मजबूत स्थितीमध्ये आहे. सध्या या दोघांच्या युतीचा झेंडा जिल्हा परिषदेच्या शिवतीर्थावर फडकत आहे. दरम्यानच्या काळामध्ये काही सदस्यांनी आपापल्या पक्षावर नाराजी प्रकट करुन विरोधकांच्या गोटात जाणे पसंत केले आहे. परंतु असे असले, तरी कायदेशीर आणि तांत्रिकदृष्ट्या ते निवडून आलेल्या राजकीय पक्षांचेच अविभाज्य घटक आहेत.
पनवेल महानगर पालिकेमुळे भाजपाच्या गोटामध्ये कमालीचा आनंद दिसत असला, तरी मतदार संघ जवळजवळ संपुष्टातच आल्याने शेकापच्या गोटामध्ये चिंतेचे वातावरण आहे. तळोजा पाचनंद या मतदार संघातून शेकापचे रामचंद्र करावकर हे सर्वसाधारण आरक्षणातून निवडून आले आहेत. परंतु महानगर पालिकेच्या अस्तित्वाने त्यांच्या मतदार संघाला धक्का लागला आहे.
शेकापचे नावडे येथून नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षणातून अरविंद पाटील विजयी झाले होते. सध्या ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्याही मतदार संघावर गदा आली आहे. शेकापचे एकनाथ देशेकर (सर्वसाधारण) यांचा शिरवील मतदार संघही इतिहासजमा होणार आहे.
शेकापच्याच लक्ष्मी कातकरी (अनु. जमाती) यांनाही गव्हाण मतदार संघावर पाणी सोडावे लागणार
आहे. सुमती फटके या वांगणीतर्फे वाजे (सर्वसाधारण महिला) मतदार संघातून विजयी झाल्या होत्या. त्यांचाही मतदार संघ पुनर्रचनेत नामशेष होणार आहे. काळुंद्रे मतदार संघातून (नागरिकांचा मागास प्रवर्ग) राजेंद्र पाटील यांनाही नवीन मतदार संघाचा शोध घ्यावा लागणार
आहे.

Web Title: Due to six constituencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.