कोपरखैरणेतील तणाव निवळला, परिस्थिती पूर्वपदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 05:11 AM2018-07-27T05:11:20+5:302018-07-27T05:12:05+5:30
सुरक्षेच्या कारणास्तव नवी मुंबईतील मोबाइल इंटरनेट सेवा बंद, पोलीस फौजफाटा तैनात
नवी मुंबई : मराठा मोर्चाने बुधवारी पुकारलेल्या आंदोलनामुळे कोपरखैरणे परिसरात निर्माण झालेली परिस्थिती आता पूर्वपदावर येऊ लागली आहे.
गुरुवारी सकाळी कोपरखैरणेतील शिवसेनेचे नगरसेवक शिवराम पाटील यांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत बुधवारच्या घटनेचा निषेध करण्यात आला; तसेच नागरिकांना शांतता पाळण्याचे आवाहन करण्यात आले. आंदोलन संपल्यानंतरही वाहनांची व मालमत्तेची तोडफोड करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे यांनी या वेळी दिली. दरम्यान, सुरक्षिततेच्या दृष्टीने बुधवारी मध्यरात्रीपासून शहरातील मोबाइल नेटवर्क बंद ठेवण्यात आले होते. तसेच खबरदारीची उपाययोजना म्हणून मुंबई मरोळ येथील ३०० पोलिसांची फौज कोपरखैरणे परिसरात तैनात करण्यात आली आहे.
मराठा आरक्षणासाठी बुधवारी पुकारलेल्या बंद आंदोलनाला कळंबोली आणि कोपरखैरणे परिसरात हिंसक वळण लागले. आंदोलकांनी अनेक ठिकाणी गाड्यांची मोडतोड केली. विशेष म्हणजे आंदोलन मागे घेण्याची घोषणा झाल्यानंतरसुद्धा कोपरखैरणेत तणाव होता. आंदोलकांनी येथील डी मार्ट चौकात पोलीस चौकी पेटवून दिली,तीन वाहनांना आग लावली. तीन टाकीजवळील हॉटेल्स व निवासी घरांवर तुफान दगडफेक केली. शिवसेनेचे नगरसेवक शिवराम पाटील यांच्या घरावरही दगडफेक करून मोडतोड केली. त्यांच्या वाहनांची नासधूस केली. कोपरखैरणेतील लहान-मोठ्या सुमारे शंभर वाहनांची मोडतोड करण्यात आली. पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थिती आटोक्यात आणली. तरीही तणाव कायम होता. या पार्श्वभूमीवर गुरुवारी शिवराम पाटील यांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी घेतला परिस्थितीचा आढावा गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी पोलीस आयुक्तांशी फोनवर चर्चा करून घटनेचा आढावा घेतला, तसेच जखमी पोलिसांच्या प्रकृतीची विचारपूस केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर का गेली, याचा शोध घेऊन दोषींवर कडक कारवाईची सूचना आयुक्तांना दिल्याचे पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यानुसार गुरुवारी पहाटे आयजी दर्जाचे दोन अधिकारी व उपायुक्त दर्जाचे दोन अधिकारी, असे चार अधिकारी नवी मुंबई आयुक्तालयात बाहेरून तपासाकरिता नेमण्यात आले आहेत.