ताणतणावामुळे मुंबईकर हृदयविकाराच्या उंबरठ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 05:22 AM2018-09-29T05:22:09+5:302018-09-29T05:22:28+5:30
बदलती जीवनशैली आणि आहारपद्धती, बदललेल्या सवयी मुंबईकरांच्या स्वास्थ्यासाठी घातक ठरत आहेत. जागतिक हृदय दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्वेक्षण अहवालानुसार यात दहा हजार मुंबईकरांशी संवाद साधण्यात आला, यात मुंबईकरांची कोलेस्ट्रॉलची पातळी वाढत असल्याचे दिसून आले आहे.
मुंबई - बदलती जीवनशैली आणि आहारपद्धती, बदललेल्या सवयी मुंबईकरांच्या स्वास्थ्यासाठी घातक ठरत आहेत. जागतिक हृदय दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्वेक्षण अहवालानुसार यात दहा हजार मुंबईकरांशी संवाद साधण्यात आला, यात मुंबईकरांची कोलेस्ट्रॉलची पातळी वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मुंबईकर हृदयविकाराच्या उंबरठ्यावर असल्याची चिंता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
२०१६ ते २०१८ या काळात एकूण दहा हजार ५९५ जणांची लिपिड प्रोफाइल चाचणी करण्यात आली. त्यांच्यापैकी ६६ टक्के पुरुष होते, तर ३४ टक्के महिला होत्या. त्यांना हृदयविकाराचा धोका कितपत आहे,
हे या तपासणीत शोधण्यात
आले.
या व्यक्तींपैकी ३० टक्क्यांहून अधिक व्यक्तींमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी अधिक होती. त्यांच्यापैकी १८ टक्के पुरुष होते, तर १२ टक्के महिला होत्या. या अभ्यासानुसार ३६-५० या वयोगटातील महिलांना अधिक धोका आहे, म्हणजेच १८ टक्के महिलांना हा धोका जास्त होता तर पुरुषांमध्ये हे प्रमाण दहा टक्के होते.
तसेच, पाच हजार ०२४ व्यक्तींची एलडीएल कोलेस्ट्रॉल चाचणी करण्यात आली. ते तुमच्या रक्तवाहिन्यांच्या कडांवर साचते. त्यामुळे गुठळ्या तयार होऊ शकतात. एलडीएलची पातळी जास्त असेल, तर अचानक रक्ताची गुठळी तयार होऊन हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.
महत्त्वाचा मुद्दा हा की, ज्या ३२ टक्के महिलांची तपासणी करण्यात आली होती, त्यांच्यापैकी २१ टक्के महिलांमध्ये एलडीएलची कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त होती. याविषयी, हृदयविकारतज्ज्ञ डॉ. प्रतीक सोनी यांनी सांगितले की, हृदयाच्या रक्तवाहिनीचा विकार होण्यासाठी आहार, जीवनशैली, पर्यावरणीय घटक कारणीभूत असतात. अतिरिक्त तणाव, व्यायामाचा अभाव आणि चुकीचा आहार हे घटक कोलेस्ट्रॉलच्या उच्च पातळीपेक्षा हृदयासाठी अधिक घातक असतात.
व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली कारणीभूत
आजच्या काळात आपल्याला स्वत:साठी म्हणून फार कमी वेळ असतो. तरुण पिढीचे लक्ष त्यांच्या करिअरवर केंद्रित असते, त्यामुळे ते आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे २०-४० या वयोगटात हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. याआधी ४० वर्षांवरील व्यक्तीला हृदयविकार झाल्याचे निदर्शनास येत असे; पण आता व्यायामाचा अभाव आणि बैठ्या जीवनशैलीमुळे आरोग्याला असणारे अपाय वाढले आहेत. कामाचे अतिरिक्त तास, प्रवास आणि तणाव यामुळे रुग्णांना रक्तदाब, मधुमेह, स्थूलपणा, थायरॉइड आणि आरोग्याच्या इतर समस्या निर्माण होतात. दिवसाला केवळ ३० मिनिटे व्यायाम केला तरी रक्तदाब कमी होतो आणि हृदयावरील ताणही कमी होतो. त्याचप्रमाणे त्यामुळे उपयुक्त एचडीएलमध्ये वाढ होते. - डॉ. रोहित शहापूरकर, हदयविकारतज्ज्ञ