सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई - अहमदनगर येथून आलेल्या कुटुंबाला सोसायटीने प्रवेश नाकारल्याने अख्ख कुटुंब रस्त्यावर बसून आहे. जुईनगर सेक्टर 23 येथे शुक्रवारी हा प्रकार घडला. त्यांच्याकडे वैद्यकीय दाखल व प्रवास पास असतानाही सोसायटीने त्यांची अडवणूक केली आहे. जुईनगर येथील कानोबा छाया सोसायटीत राहणाऱ्या बाळासाहेब आंधळे यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. पती, पत्नी व दोन मुले असा त्यांचा कुटुंब आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते अडीच महिन्यापूर्वी अहमदनगर येथील गावी गेले होते. परंतु लॉकडाऊन वाढतच चालल्याने व जमा असलेले पैसे देखील संपल्याने ते शुक्रवारी पून्हा नवी मुंबईत आले. याकरिता त्यांनी वैद्यकीय दाखल्यासह पोलिसांचा प्रवास परवाना देखील मिळवलेला आहे. यानंतर देखील त्यांना सोसायटीत प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे शुक्रवारी सकाळ पासून हे कुटुंब सोसायटीच्या गेटवर बसून आहे.
सदर ठिकाणी ते भाडोत्री राहणारे आहेत. यामुळे घर मालकांनीदेखील त्यांना सोसायटीत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु सोसायटीने स्थलांतरित असल्याच्या कारणावरून त्यांना प्रवेश नाकारला आहे. दरम्यान त्यांनी याप्रकरणी नेरुळ पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी सोसायटीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना कारवाईची इशारा दिला. त्यानंतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास या कुटुंबासाठी सोसायटीचे फाटक उघडण्यात आले. परंतु विनाकारण झालेल्या अडवणुकीमुळे कुटुंबियांना सहन कराव्या लागलेल्या मनस्ताप बद्दल संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे. लॉकडाऊन लागल्यापासून मुंबईकडे व्यक्तींना गावाकडे प्रवेश नाकारण्याचे प्रकार घडत आहेत. अशातच गावकडून मुंबईत आलेल्यांनाही सोसायटीत प्रवेश नाकारला जात असल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत.