नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : दरवर्षी फेब्रुवारी ते जून ५ महिने आंब्याचे फळबाजारावर वर्चस्व असते; परंतु यावर्षी खराब हवामानामुळे उत्पादनावर परिणाम झाला असून, आवक घटली आहे. यंदा कोकणच्या हापूसची सर्वाधिक आवक १ एप्रिल ते १० मे, अशी ४० दिवस राहणार आहे.
गुजरात व दक्षिणेकडील राज्यांतही उत्पादन कमी झाल्याने यावर्षी ग्राहकांना कमी प्रमाणात आंबा उपलब्ध होणार असून, भावही तेजीत राहतील. गतवर्षी फेब्रुवारीपासून आंब्याची मोठी आवक सुरू झाली होती; परंतु यावर्षी फेब्रुवारीमध्ये गतवर्षीपेक्षा ५८३ टन कमी आवक झाली आहे. गतवर्षी मार्चच्या सुरुवातीला सरासरी ४० हजार पेट्यांची आवक होत होती. यावर्षी २० ते २५ हजार पेट्यांचीच आवक होत आहे.
यावर्षी १ एप्रिलपासून हापूस, बदामी, लालबाग, राजापुरी, केसरची आवक होईल, तर एप्रिलनंतर जुन्नर हापूसची आणि २५ जूननंतर दशेरी लंगडाची आवक होईल.
प्रतिडझन हापूसचे दरवर्ष होलसेल किरकोळ२०२४ २००-१,००० ५००-१,५००२०२५ ३००-१,४०० ७००-२,०००
गतवर्षी फेब्रुवारीपासून आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली होती. यावर्षी खराब हवामानामुळे आवक घटली आहे. हापूसची सर्वाधिक आवक १ एप्रिल ते १० मेदरम्यान राहील. दक्षिणेतील आंब्याची आवकही कमी होण्याची शक्यता आहे.-संजय पानसरे, संचालक
आवक ४० टक्क्यांनी कमी : आंध्र प्रदेश, कर्नाटक व केरळमध्ये उत्पादन कमी आहे. गुजरातमध्येही अशीच स्थिती आहे. यावर्षीचा हंगाम गतवर्षीपेक्षा ३० ते ४० टक्के कमी राहण्याची शक्यता आहे.