मुसळधार पावसामुळे ग्राहकांची पाठ, ३० टक्के भाजीपाला पडून
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 10:33 AM2024-07-10T10:33:53+5:302024-07-10T10:34:02+5:30
ग्राहक नसल्यामुळे आवक घटली; भाजीपाल्याचे दरही होऊ लागले कमी
नवी मुंबई : मुसळधार पावसामुळे किरकोळ विक्रेत्यांनी, ग्राहकांनी बाजार समितीमधील भाजीखरेदीकडे पाठ फिरविली आहे. जवळपास ३० टक्के मालाची विक्री झाली नाही. ग्राहक नसल्यामुळे पालेभाज्यांसह अनेक वस्तूंचे दरही कमी होऊ लागले आहेत. मुंबई, नवी मुंबईमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम बाजार समितीमधील व्यवहारांवरही झाला आहे. सोमवारी बाजार समितीमध्ये ६३४ ट्रक टेम्पोमधून २९९७ टन भाजीपाल्याची आवक झाली होती. यामध्ये ४ लाख ९० हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश होता. परंतु पावसामुळे जवळपास ४० टक्के मालाची विक्री झाली नव्हती. यामुळे मंगळवारी व्यापाऱ्यांनी कमी माल मागविला होता. दिवसभरात ५१२ वाहनांमधून २४३० टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. दुसऱ्या दिवशीही पावसामुळे विक्रीवर परिणाम झाला होता. जवळपास ३० टक्के माल शिल्लक राहिला आहे.
ग्राहक नसल्यामुळे बीट, दुधी भोपळा, फरसबी, फ्लॉवर,काकडी, ढोबळी मिरची, कडीपत्ता, कोथिंबीर, मेथी, पुटिना व शेपूच्या दरामध्ये घसरण झाली आहे. गवार, घेवडा, कारली, कोबी व टोमॅटोच्या दरामध्ये मात्र तेजी कायम आहे. पाऊस सुरूच राहिला तर दर कमी होऊ शकतात, पाऊस घडल्यास मागणी वाढून दर वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.