बेशिस्तीमुळे धबधबे ठरताहेत मृत्यूचा सापळा; राज्यात १४ पर्यटकांचा मृत्यू
By नामदेव मोरे | Published: July 10, 2024 10:24 AM2024-07-10T10:24:43+5:302024-07-10T10:24:58+5:30
पावसाळी पर्यटनासाठी हवी कडक नियमावली
नवी मुंबई: पाऊस सुरू होताच राज्यातील सर्व धबधब्यांवर हौशी पर्यटकांचा महापूर येऊ लागला आहे. सुरक्षेचे नियम धाब्यावर बसविल्यामुळे धबधबे मृत्यूचा सापळा ठरू लागले आहेत. सहा जूनपासून आतापर्यंत राज्यातील विविध धबधबे व समुद्रकिनाऱ्यांवर १४ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अपघात रोखण्यासाठी शासनाने कडक नियमावली करावी व प्रशासनाने त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, बेशिस्तपणा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
ताह्मिणी घाटातील मिल्कीबार धबधब्यामध्ये तरुणाने टाकलेली उडी व त्याचा झालेला मृत्यू याविषयीचा व्हिडीओ प्रसारमाध्यमांवर देशभर व्हायरल होऊ लागला आहे. लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात एकाच कुटुंबामधील पाच जणांचा धबधब्यात बुडून मृत्यू झाल्याचा व्हिडीओही प्रसारमाध्यमांमधून व्हायरल झाला. या अपघातांविषयी हळहळ व्यक्त करण्यात आली. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यातील भुशी डॅम, ताम्हिणी घाट, कुंडलिका नदी पात्र, अलिबाग समुद्र, बदलापूरमधील कोंडेश्वर धबधबा, भामरागड येथील बिनाकुंडा धबधबा, लांजा येथील बेर्डेवाडी धबधबा व सातारा येथील केळवली धबधब्यावरही दुर्घटना घडली आहे. भामरागड येथील दुर्घटनेमध्ये चार दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणाचा व त्याला वाचविण्यासाठी गेलेला दुसरा तरुण त्यांच्या कुटुंबीयांसमोरच वाहून गेला.
धबधब्यावर होणारे अपघात रोखण्यासाठी शासन, प्रशासन, स्थानिक वनसमित्या यांनी योग्य नियमावली तयार करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. पर्यटकांनीही स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे. -
सुनील गायकवाड, सचिव, शिवदुर्ग मित्र, लोणावळा
महाराष्ट्रातील दुर्घटना
५ जून - ताम्हिणी घाटातील मिल्कीबार धबधब्यात दरीत कोसळून एकाचा मृत्यू
११ जून - गडचिरोली भामरागड येथील बिनागुंडा धबधब्यात तरुणाचा, त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू
१७ जून - लांजा येथील वेरवली बेर्डेवाडी धबधब्यात २५ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू
२७ जून - बदलापूर कोंडेश्वर धबधब्यात बुडून ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू
१३ जून - अलिबाग येथे समुद्रात पोहताना मूळ छत्रपती संभाजीनगर व आता आळंदी येथे राहणाऱ्या तरुणाचा मृत्यू
२९ जून - ताह्मिणी घाटातील मिल्कीबार धबधब्यामध्ये बुडून एकाचा मृत्यू
३० जून - भुशी डॅमजवळील धबधब्यामध्ये बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
३० जून - सातारामधील केळवली धबधब्यामध्ये २२ वर्षीय तरुण वाहून गेला
७ जुलै - कुंडलिका नदीपात्रात रिव्हर राफ्टिंग करताना अभियंत्याचा मृत्यू