नारायण जाधव,नवी मुंबई :नवी मुंबईतील सिडकोच्या पाच हजार आणि महापालिकेच्या ११२५ कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लाेकार्पण शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे केले. यात महापालिकेचा घणसोली-ऐरोली खाडीपूल आणि सिडकोचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व विमानतळास जोडणारा पूल, अटल सेतू ते उलवे जंक्शन सागरी मार्गासह खारघर-तुर्भे जोडमार्गाचा समावेश आहे. या जोडमार्गाच्या कामात तुर्भे ते खारघरपर्यंतच्या भुयारी मार्गाचा अर्थात बोगद्याचाही समावेश आहे.
ही सर्व कामे येत्या तीन-चार वर्षांत पूर्ण होणार असून यामुळे नवी मुंबईकरांचा प्रवास सुसाट होणार आहे. यामुळे त्यांचा प्रवासाचा वेळ, श्रम वाचून इंधनाची बचत होऊन धूर, आवाजाचे प्रदूषणसु्द्धा कमी होण्यास मदत होणार आहे.
१ - घणसोली-ऐरोली दरम्यानच्या सहा पदरी १९५० मीटर लांबीच्या या खाडीपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर सध्या ठाणे-बेलापूर रस्त्यावरून जे अंतर कापण्यासाठी १६ मिनिटे लागतात ते पाच ते सहा मिनिटांवर येणार आहे. या कामावर ४९२ कोटी रुपये खर्च होणार आहेत.
२ - नवी मुंबई शहरातील एक वेगाने विकसित होणारे आणि भरभराटीचे उपनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खारघर-तळोजाला नवी मुंबईतील वाशी, तुर्भे, जुईनगर, नेरुळ, एपीएमसी मार्केट, टीटीसी औद्याेगिक वसाहत यांना जोडणाऱ्या ५.४९ किमी लांबीचा केटीएलआर अर्थात खारघर-तुर्भे लिंक रोडचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांनी केले. यात तुर्भे ते खारघरदरम्यान पारसिक डाेंगराखालील १.७६ किमीच्या बोगद्याचाही समावेश आहे. या कामाची चार वर्षांची डेडलाईन आहे. सुमारे ३१६६ कोटी रुपये यावर खर्च होणार आहेत.३ - उलवे सागरी मार्ग अटल सेतू जंक्शनपासून ते आम्र मार्ग जंक्शनपर्यंत बांधण्यात येणार असून, त्याची लांबी सात किमी इतकी आहे. यात मूळ रस्ता ५.८ किमी असून, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारी मार्गिका १.२ किमी आहे. या कामावर ९१२ कोटी रुपये खर्च होणार आहेत.