नवी मुंबई : मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने अखेर मंगळवारी मध्यरात्री ऐरोलीतील नागरिक रस्त्यावर उतरले. शहरात ठिकठिकाणी सातत्याने विजेचा लपंडाव सुरू असल्याने रखरखत्या उन्हात वीज ग्राहकांचाही पारा चढत आहे.
शहरात तापमानाचा पारा चाळिशीच्या पार जात आहे. रात्रीदेखील ३० ते ३५ अंशावर तापमान राहत असल्याने नागरिक अधिकच त्रस्त आहेत. त्यामुळे दिवसा तसेच रात्री अंगाची होणारी लाहीलाही टाळण्यासाठी सर्वच जण एसी, कूलरचा गारवा घेत आहेत. अशातच शहरात ठिकठिकाणी विजेच्या लपंडावाचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे ना घरात थांबू शकतो, ना घराबाहेर जाऊ शकतो, अशी अवस्था होत आहे. असाच अनुभव मागील काही दिवसांपासून ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे व वाशी परिसरातील नागरिक घेत आहेत. विजेअभावी लहान मुले, वृद्ध, रुग्ण कमालीचे त्रस्त झाले आहेत.
यामुळे महावितरणविरोधात नागरिकांचा रोष वाढत आहे. अशातच मंगळवारी रात्री ऐरोली परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून रस्ता अडवून महावितरणविरोधात घोषणाबाजी केली. त्याचवेळी घणसोली परिसरातदेखील वीजपुरवठा खंडित झाला होता. दोन्ही विभागातील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कामाची गती वाढवून सुमारे साडेतीन ते चार तासांत दोन्ही ट्रान्सफॉर्मर बसवले. मात्र, प्रतिवर्षी उन्हाळा सुरू होताच महावितरणचा वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे. तर उन्हाळ्यात विजेचा वापर वाढत असल्याने ट्रान्सफॉर्मरवर लोड येऊन बिघाडाच्या घटना घडतात, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
अनधिकृत जोडण्यांचा भार-
शहरातील अनेक गावे, गावठाण परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे असून, त्या ठिकाणी निवासी, वाणिज्य वापरासाठी चोरीच्या विजेचा वापर होत आहे. यामुळेदेखील संबंधित ट्रान्सफॉर्मरवर भार वाढून त्यात बिघाड होण्याच्या घटना सातत्याने घडत असतात.
उन्हाळ्यात वाढतो विजेचा वापर-
१) उन्हाचा पारा चढताच नागरिकांकडून घर, कार्यालयातील पंखा तसेच एसीचा वापर वाढतो.
२) त्यामुळे उन्हाळ्यात विजेची मागणी वाढत असते. अशातच अनेक भागांमध्ये १५ ते २० वर्षांपूर्वीच्या कमी क्षमतेच्या वायरी असल्याने त्या जळण्याच्यादेखील घटना घडत असतात.