पावसामुळे भाजीपाला कचऱ्यात, किरकोळ मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 06:20 AM2022-07-16T06:20:52+5:302022-07-16T06:21:04+5:30
१० ते १५ टक्के भाजीपाला कुजला.
नवी मुंबई : पावसामुळे भाजीपाला खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. १० ते १५ टक्के भाजीपाला फेकून द्यावा लागत आहे. मुंबई बाजार समितीमध्ये पाच दिवसांत पालेभाज्यांच्या तीन लाख जुड्या फेकून द्याव्या लागल्या आहेत. पालेभाज्यांच्या कचऱ्याचे प्रमाण ५० टनावरून ७५ टनावर पोहोचले आहे. भाजीपाला खराब होत असल्यामुळे किरकोळ मार्केटमध्येही भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतिदिन ४०० ते ६०० ट्रक, टेम्पोमधून दोन हजार ते ३ हजार टन भाजीपाला विक्रीसाठी येत असतो. सोमवार ते शुक्रवार पावसामुळे आवक कमी होती. शुक्रवारी पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे आवक वाढली.
५८२ ट्रक, टेम्पोमधून २७९६ टन भाजीपाला विक्रीसाठी आला असून त्यामध्ये ५ लाख १५ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे, मात्र पावसामुळे भाजीपाला खराब होऊन १० ते १५ टक्के माल फेकून द्यावा लागत आहे. सोमवार ते शुक्रवारदरम्यान सुमारे तीन लाख जुड्या भाजीपाला फेकून द्यावा लागला आहे. मार्केटमध्ये गेल्या आठवड्यात प्रतिदिन ५० टन कचरा तयार होत होता. सोमवारपासून सरासरी ७५ टन कचरा तयार होत आहे.
फरसबी, वाटाणा महागला
पाावसामुळे वाटाणा, फरसबी, दुधी भोपळा यांचे दर वाढले आहेत. किरकोळ मार्केटमध्येही माल खराब होत असल्यामुळे सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत. अनेक भाज्यांचे दर प्रतिकिलो १०० रुपयांवर पोहचले आहेत. फरसबीचे दर १२५ रुपयांवर आणि वाटाण्याचे दर १५० रुपये किलोवर पोहोचले आहेत. भाजीपाला खराब होत असल्यामुळे दर काही प्रमाणात वाढल्याची माहिती किरकोळ विक्रेत्यांनी दिली.
एपीएमसी व किरकोळ मार्केटमधील प्रतिकिलो दर
वस्तू होलसेल दर किरकोळ दर
वाटाणा ८० ते १२० १२० ते १५०
फरसबी ७० ते १०० १०० ते १२०
गवार ३४ ते ६० १०० ते १२०
घेवडा ४० ते ६० ८० ते १००
शेवगा शेंग ३० ते ४५ १०० ते १२०
तोंडली २५ ते ४५ १०० ते १२०
टोमॅटो, वांगी स्वस्त
पावसाळा सुरू झाल्यापासून टोमॅटोचे दर कमी झाले आहेत. होलसेल मार्केटमध्ये टोमॅटोचे दर १५ ते २६ रुपये किलो असून किरकोळ मार्केटमध्येही ४० ते ५० रुपये किलो दराने ते उपलब्ध होत आहेत.