रमजानमुळे खजूरला ग्राहकांची पसंती, ८० ते २५०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री
By नामदेव मोरे | Published: March 24, 2023 07:05 PM2023-03-24T19:05:07+5:302023-03-24T19:05:14+5:30
बाजार समितीमध्ये आवक वाढली
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खजूरची आवक वाढू लागली आहे. प्रतिदिन २० ते २५ टन विक्री होत असून २१ मार्चला विक्रमी १०६ टन विक्री झाली आहे. जगभरातून जवळपास ५० प्रकारची खजूर विक्रीसाठी येत असून दर्जा प्रमाणे प्रतिकिलो ८० ते २५०० रुपये दराने विक्री होत आहे.
हिवाळ्यात व रमजानच्या महिन्यामध्ये ग्राहकांकडून खजूरला मोठ्या प्रमाणात मागणी असते. उपवास सोडण्यासाठी खजूर चा उपयोग होत असल्यामुळे या कालावधीमध्ये त्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. मुंबई बाजार समितीमध्ये प्रतिदिन २० ते २५ टनांची आवक होत आहे. इराक, इराण, इजिप्त, सौदी अरेबीया व इतर देशांमधून खजूरची आवक होत असते. दर्जा प्रमाणे खजूरला बाजारभाव मिळत असतो. सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा खजूरची सरासरी ८० ते १५० रुपये दराने विक्री होत आहे. उत्तम प्रतिच्या खजूरला प्रतिकिलो २५०० पर्यंतचा भाव मिळत आहे.
बाजार समितीचे माजी संचालक किर्ती राणा यांनी सांगितले की नागरिकांमध्ये आरोग्यविषयी जागरूकता वाढली आहे. यामुळे हिवाळा व रमजानच्या महिन्यात खजूरला मोठ्या प्रमाणात मागणी असते. सद्यस्थितीमध्ये विविध प्रकारची व उत्तम प्रतिची खजूर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे.