चालकांच्या आंदोलनामुळे पेट्रोल पंपांवर बोंबाबोंब, वाहनांच्या रांगा, काही ठिकाणी लागले "बंद"चे बोर्ड
By सूर्यकांत वाघमारे | Published: January 2, 2024 08:35 PM2024-01-02T20:35:59+5:302024-01-02T20:36:20+5:30
Navi Mumbai : हिट अँड रन कायद्याविरोधात चालकांनी केलेल्या आंदोलनाचा फटका अत्यावश्यक सेवेवर बसू लागला आहे. डिझेल, पेट्रोलचा पुरवठा बंद होण्याच्या भीतीने नागरिकांनी वाहनांच्या टाक्या फुल करण्यावर जोर देत पेट्रोल पंपांवर गर्दी केली होती.
नवी मुंबई -हिट अँड रन कायद्याविरोधात चालकांनी केलेल्या आंदोलनाचा फटका अत्यावश्यक सेवेवर बसू लागला आहे. डिझेल, पेट्रोलचा पुरवठा बंद होण्याच्या भीतीने नागरिकांनी वाहनांच्या टाक्या फुल करण्यावर जोर देत पेट्रोल पंपांवर गर्दी केली होती. यामुळे काही पंपावरील साठा दुपारीच संपून पेट्रोल पंप बंद असल्याचे बोर्ड झळकवले होते.
कायद्याला विरोध दर्शवत अवजड वाहनांच्या चालकांनी सोमवारपासून अचानक आंदोलन पुकारले आहे. यामुळे पेट्रोल, डिझेल यांचाही पुरवठा थांबून त्यांचा तुटवडा भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे ऐन वेळी होणारी गैरसोय टाळण्यासाठी मंगळवारी सकाळपासून वाहन धारकांनी पेट्रोल पंपांवर गर्दी केली होती. आंदोलन किती दिवस चालेल याची श्वाश्वती नसल्याने सर्वांकडूनच टाक्या फुल करून घेतल्या जात होत्या. दुचाकी, कार यासह लांबच्या मार्गावर धावणाऱ्या वाहनांचाही त्यात समावेश होता. यामुळे काही पेट्रोल पंपाच्या टाक्या दुपारीच रिकाम्या झाल्याने त्याठिकाणी "बंद" चे फलक लागले होते. यामुळे पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी अनेकांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी धावाधाव करावी लागली.