नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या जालन्यातील अंतरवाली सराटी गावातील मनोज जरांगे पाटील यांनी उपाेषण सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी बेछूट लाठीमार केल्याने राज्यभरातील सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. याचे सर्वाधिक पडसाद मराठवाड्यातच उमटले आहेत. त्यातच आंदोलकांनी पहिल्याच एसटीची शिवशाही बस पेटवून दिली होती. यानंतर गेल्या दोन तीन दिवसांपासून एसटी महामंडळाने आपल्या अनेक बस फेऱ्यांची सेवा बंद केली आहे. याचा सर्वाधिक फटका मुंबई आणि परिसरात राहणाऱ्या मराठवाड्यातील प्रवाशांना बसला आहे. एसटी बंद असल्याने त्यांनी खासगी ट्रॅव्हल्सचा आधार घेतल्याने या ट्रॅव्हल्सच्या चालकांनी आपले दर दीड ते दोन हजार असे अव्वाच्या सव्वा केल्याच्या तक्रारी आहेत.
येथील प्रवाशांना मोठा फटका
मराठाआरक्षण आंदोलनामुळे गेल्या तीन दिवसांत एसटीच्या २५० आगारांपैकी जवळपास ४६ आगार बंद आहेत. प्रामुख्याने अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, जालना, नांदेड, बीड व धाराशीव, लातूर या जिल्ह्यांमध्ये बंदचा प्रभाव अधिक आहे. एसटीचे सुमारे सव्वापाच कोटीहून अधिक नुकसान झाले आहे.
सव्वातेरा कोटींचे नुकसान
एसटीच्या एकूण बस फेऱ्यांपैकी सुमारे ६२०० फेऱ्या बंदमुळे रद्द केलेल्या होत्या. यामुळे महामंडळाचे दोन कोटी ६० लाखाहून अधिक नुकसान झालेले आहे. आतापर्यंतच्या आंदोलनामुळे १३ कोटी २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे महामंडळाने सोमवारी स्पष्ट केले होते.
शीव-पनवेल महामार्गावर गर्दी
मुंबईतून मराठवाड्यात जाणाऱ्या बहुतेक खासगी ट्रॅव्हल्स या शीव-पनवेल आणि जुन्या मुंबई-पुणे मार्गाने पनवेल मार्गे जातात. यामुळे एसटी बंद असल्याने मराठवाड्यातील गावी जाण्यासाठी मराठवाडावासीय शीव-पनवेल महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स पकडण्यासाठी गर्दी करीत आहेत. ही गर्दी वाशी, कळंबोलीत मॅकडोनाल्डसह पनवेल बसस्थानकाबाहेर जास्त प्रमाणात दिसत आहे. रात्रीच्या वेळी तर जत्रेचे स्वरुप आलेले दिसत आहे.
मदतीसाठी हेल्पलाईन
गेल्या आठवड्यात आरटीओने कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची खासगी ट्रॅव्हल्सच्या चालकांनी लूट करू नये यासाठी हेल्पलाईन क्रमांक सुरू केला होता. याच क्रमांकावर मराठवाडाच नव्हे तर राज्यातील कोणत्याही भागात जाणाऱ्या प्रवाशाची कुणी लूट करीत असेल, जास्त भाडे आकारत असेल, तर त्यांनी ८८५०७८३६४३ या व्हॉट्सॲप नंबरवर तक्रार करावी, संपर्क साधावा, असे आवाहन आरटीओने केले आहे.