नवी मुंबई : ऐरोली येथील महावीर प्लाझा इमारतीमधील रहिवाशांनी विकासकाविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. इमारतीमध्ये अनेक अनधिकृत बदल करण्यात आले असल्याने आपत्कालीन प्रसंगी रहिवाशांच्या सुटकेचे मार्ग बंद झाले आहेत. मात्र यासंदर्भात रहिवाशांनी तक्रारी करून देखील ठोस कारवाई होत नसल्याने १ जूनला त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.ऐरोली सेक्टर १९ येथील महावीर प्लाझा या इमारतीच्या २२ व्या मजल्यावर आग लागल्याची घटना ३० एप्रिलला घडली होती. या दुर्घटनेनंतर रहिवाशांना स्वत:ची सुटका करून घेण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. अग्निशमन दलालाही आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे भविष्यात पुन्हा अशी दुर्घटना घडल्यास जीवितहानीच्या शक्यतेची भीती तिथल्या रहिवाशांकडून व्यक्त होत आहे. यामुळे सदर इमारतीमध्ये विकासकाकडून सर्व नियम धाब्यावर बसवून करण्यात आलेली अनधिकृत बांधकामे पाडण्याची मागणी रहिवाशांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील मोकळ्या जागेत प्लॅस्टिकचे शेड बांधून हॉटेल चालवले जात आहे. तर इतर पार्किंगची जागा रुग्णालयाला भाड्याने देण्यात आल्याने सोसायटीमधील रहिवाशांना रस्त्यावर वाहने उभी करावी लागतात. इमारतीमधील एक हॉल लग्नसमारंभ अथवा इतर कामासाठी भाड्याने दिला जात असल्यानेही त्यानिमित्ताने येणाऱ्यांच्या वाहनांमुळेही वाहतूककोंडी होत आहे.सोसायटीच्या वापरासाठी असलेल्या दोनपैकी एक प्रवेशद्वार देखील बंद करण्यात आलेला आहे. तर आपत्कालीन प्रसंगी बाहेर पडण्याच्या जागेतच इमारतीचा मीटर रूम बनवण्यात आलेला आहे. त्यामुळे या मीटर रूमलाच आग लागल्यास रहिवाशांचा बाहेर पडण्याचा मार्ग बंद होऊ शकतो.
अनधिकृत बांधकामामुळे ऐरोलीतील रहिवाशांच्या जीवाला धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 12:09 AM