कळंबोली : रोडपालीला पाणीपुरवठा करण्याकरिता जोडणी केंद्रापासून ६०० व्यासाची स्वतंत्र अडीच कि.मी. जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्याकरिता रस्ते मोठ्या प्रमाणात खोदण्यात आले आहेत. ऐन पावसाळ्यात ही आपत्ती निर्माण करण्यात आलेली आहे. त्यामुळे रहिवाशांना गैरसोयीला नक्कीच सामोरे जावे लागणार आहे.
रोडपाली परिसरात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भासत आहे. त्याचबरोबर येथे सिडकोच्या घरांचेही काम सुरू आहे. त्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे दोन कोटी खर्च करून नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. रोडपाली तलाव ते केएलई कॉलेजपर्यंत रस्ता खोदून पाइप टाकण्यात आला आहे. त्याचबरोबर येथून उद्यानापर्यंतचे कामही सुरू आहे. रस्त्याला खड्डे पडले असल्याने येथे वाहने चालवणे अवघड होत आहे. काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. त्या वेळी रस्त्यावर चिखल त्याचबरोबर पाणी साचून जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. या बाबत सिडकोने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नगरसेविका मोनिका प्रकाश महानवर यांनी केली आहे.
सिडकोचे कार्यकारी अभियंता गिरीश रघुवंशी यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, हे काम पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सुरू आहे. त्यानुसार या विभागाकडून रस्त्याची लवकरच दुरुस्ती करण्यात येणार आहे. रस्त्याच्या कामासह हे काम त्या एजन्सीला देण्यात आले आहे. आम्ही पाणीपुरवठा विभागाला याबाबत कळवले आहे. त्यानुसार खडी टाकून रोलिंग करण्यात येणार आहे. पावसाळ्यानंतर रस्ता पूर्ववत करण्यात येईल.