नवी मुंबई: गुन्हे शाखा पोलिसांनी वाशी परिसरात घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीचे दागिने व मोटरसायकल हस्तगत केली आहे. वाशी परिसरातून चोरलेल्या मोटारसायकलवरूनच ते वाशीतच गुन्हे करत होते.
वाशी येथे काही दिवसांपूर्वी दोन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. त्यामध्ये एकाच टोळीचा हात असल्याचा संशय पोलिसांना बळावला होता. यावरून गुन्हे शाखा कक्ष एकचे वरिष्ठ निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी सहायक निरीक्षक निलेश पाटील, उपनिरीक्षक सचिन बाराते, प्रशांत कुंभार, अशोक खैरे, विश्वास पवार आदींचे पथक केले होते. या पथकाने वाशी परिसरात तपास करून संशयितांची माहिती मिळवली होती. त्याद्वारे रात्रीच्या वेळी पाळत ठेवून दोघा संशयितांना ताब्यात घेतले होते.
अधिक चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. युसूफ शेख (३८) व आसिफ शेख (४३) अशी दोघांची नावे आहेत. युसूफ हा विक्रोळीला असून आसिफ दिवा येथे राहणारा आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल देखील हस्तगत करण्यात आली असून त्यांनी ती वाशीतूनच चोरल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यांच्याकडून वाशीतील दोन गुन्हे उघड झाले असून त्यामधील दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. दोघेही सराईत गुन्हेगार असून युसुफवर २६ पेक्षा जास्त तर आसिफ याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत.