नवी मुंबई : बनावट सिमकार्डद्वारे अज्ञाताने तरुणीच्या तीन बँक खात्यातील रकमेवर डल्ला मारल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सायबर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. अज्ञाताने आधार नोंदणीच्या बहाण्याने तरुणीला मोबाइलवर आलेला ओटीपी मागितला असता, तिने तो दिल्याने हा प्रकार घडला आहे.रंजिता कोळमकर (२६) असे फसवणूक झालेल्या तरुणीचे नाव आहे. गतमहिन्यात त्यांना अनोळखी व्यक्तीने मोबाइलवर फोन करून त्यांच्या मोबाइलवर आलेल्या मेसेजमधील ओटीपी नंबर मागितला होता. सिमकार्डची आधारला नोंदणी करण्यासाठी तो ओटीपी हवा असल्याचे फोनवरील व्यक्तीने सांगितले होते. या वेळी रंजिता यांनी कसलीही खातरजमा न करता अज्ञात व्यक्तीला ओटीपी नंबर दिला. मात्र, सदर व्यक्तीने त्या ओटीपीच्या आधारे त्यांच्या मोबाइल सिमकार्डचे बनावट सिमकार्ड तयार केले. त्याद्वारे रंजिता त्यांच्या तीन बँक खात्यातील एकूण ७८ हजार रुपयांच्या रकमेवर डल्ला मारला. बँक खात्यातून पैसे कमी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याची बाब निदर्शनास आली. या प्रकरणी त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार तपासांती बनावट सिमकार्डद्वारे बँक खात्याचे ओटीपी प्राप्त करून त्यामधील रकमेवर अज्ञाताने डल्ला मारल्याचे समोर आले. या प्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
बनावट सिमकार्डद्वारे बँक खात्यावर डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 3:04 AM