घंटागाडीमुळे अरुंद रस्त्यावर कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 01:46 AM2018-08-23T01:46:11+5:302018-08-23T01:46:39+5:30
दैनंदिन कचरा गोळा करणाऱ्या मोठ्या घंटागाडीमुळे अरुंद रस्त्यावर वाहतूककोंडी होत आहे
नवी मुंबई : दैनंदिन कचरा गोळा करणाऱ्या मोठ्या घंटागाडीमुळे अरुंद रस्त्यावर वाहतूककोंडी होत आहे. विशेष म्हणजे झोपडपट्टी, गाव- गावठाणातील रस्ते अरुंद असल्याने त्याठिकाणसाठी छोट्या गाड्यातून कचरा गोळा केला जातो. परंतु अनेक ठिकाणी या नियमाला हरताळ फासला जात असल्याचे दिसून आले आहे.
दैनंदिन कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी शहरातील गल्लीबोळात घंटागाड्या फिरतात. दिवसभरात नियोजित वेळेत या घंटागाड्या विविध सोसायटी व वसाहतीतून कचरा संकलित करतात. त्यासाठी संपूर्ण शहरासाठी एकाच ठेकेदारामार्फत शहरातील कचरा उचलण्याचे काम केले जाते. त्यासाठी सोयीनुसार लहान आणि मोठ्या स्वरूपाच्या घंटागाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु अनेकदा वसाहतीअंतर्गतच्या अरुंद रस्त्यावर मोठ्या आकाराच्या घंटागाड्यातून कचरा गोळा केला जात असल्याचे दिसून आले आहे. कोपरखैरणे विभागात मोठ्या प्रमाणात माथाडींच्या बैठ्या चाळी आहेत. या चाळीतील अंतर्गत रस्ते अरुंद आहेत. येथील बहुतांशी घरांचे वाढीव बांधकाम झाल्याने समोरील रस्त्यावर रिक्षा, खासगी वाहने व मोटरसायकल पार्क केल्या जातात. त्यामुळे हे रस्ते आणखीनच अरुंद झाले आहेत. या रस्त्यांच्या दुसºया बाजूला खासगी इमारती आहेत. या इमारतीतील कचरा मोठ्या आकाराच्या घंटागाडीद्वारे गोळा केला जातो. येथील निमुळत्या रस्त्यावर वाहतूककोंडी होत आहे. असे प्रकार नेहमीचेच झाल्याने स्कूल बस व रिक्षांचा खोळंबा होत आहे. यासंदर्भात महापालिकेने संबंधित ठेकेदाराला समज द्यावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.