सायन-पनवेल महामार्गावर कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 02:17 AM2017-08-15T02:17:17+5:302017-08-15T02:17:20+5:30
पावसाने दडी मारल्याने सायन-पनवेल मार्गावर ठिकठिकाणी दुरुस्तीची कामे सुरु असतानाच पुन्हा पावसाने हजेरी लावली.
नवी मुुंबई : पावसाने दडी मारल्याने सायन-पनवेल मार्गावर ठिकठिकाणी दुरुस्तीची कामे सुरु असतानाच पुन्हा पावसाने हजेरी लावली. यामुळे दुरुस्तीकामात अडथळा होवून परिस्थिती पूर्ववत झाल्याने अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. उरण फाटा व तुर्भे येथे खड्ड्यांमुळे पुन्हा काही किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्याची संधी साधत सायन-पनवेल मार्गावर अनेक ठिकाणी दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली होती. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे प्रवाशांना त्रास होत असून अपघाताच्या देखील घटना घडत आहेत. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून त्याठिकाणी मृत्यूचे सापळे तयार झाले आहेत.
पाऊस थांबल्यानंतर ठेकेदारांकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. अशातच सोमवारी पुन्हा पावसाने शहरात जोरदार हजेरी लावली. यामुळे तात्पुरत्या स्वरुपात बुजवलेले खड्डे पुन्हा वर आले आहेत. यामुळे सायन-पनवेल मार्गावर सानपाडा ते तुर्भे दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. रात्री उशिरापर्यंत याठिकाणी वाहतूक धीम्या गतीने सुरु होती. त्याशिवाय उरणफाटा येथे देखील वाहतुकीला अडथळा होवून वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.
त्याशिवाय पावसाच्या पुनरागमनामुळे कोपरखैरणे, घणसोली दरम्यान दर्गालगत, कोपरी नाका व इतर मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्याठिकाणी तारेवरची कसरत करत चालकांना वाहने चालवावी लागत आहेत.