रस्ता खचल्याने डम्पर रुतला, जीवितहानी टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 02:17 AM2019-06-14T02:17:02+5:302019-06-14T02:17:36+5:30
जीवितहानी टळली : खोदकामाच्या ठिकाणी मातीचा भराव
नवी मुंबई : खडीची वाहतूक करणारा डम्पर खचलेल्या रस्त्यात रुतल्याचा प्रकार वाशीत घडला. गुरुवारी दुपारी घडलेल्या या प्रकारामुळे त्या ठिकाणी काही वेळासाठी रहदारीला अडथळा निर्माण झाला होता. रस्त्यावर खोदकाम केल्यानंतर त्यावर योग्यरीत्या डांबरीकरण न करण्यात आल्याने हा अपघात घडला असून, थोडक्यात मोठी दुर्घटना टळली.
वाशी सेक्टर १० येथील साईनाथ हायस्कूलच्या मार्गावर हा अपघात घडला. सदर मार्गावर चार शाळा व महाविद्यालये आहेत. यामुळे त्या ठिकाणावरून शाळकरी विद्यार्थ्यांची स्कूल बस, व्हॅनने अथवा पायी मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. तीन महिन्यांपूर्वी त्या ठिकाणी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले होते. तर पावसाची चाहूल लागताच तिथल्या खोदकामावर मातीचा भराव टाकून खड्डा बुजवण्यात आला आहे. मात्र, दोन दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे तिथल्या मातीचा चिखल झाला आहे. अशातच गुरुवारी दुपारी तिथल्या रस्त्यावरून खडीचा डम्पर जात असताना त्याचे चाक खोदकामाच्या ठिकाणी खचलेल्या रस्त्यात रुतले. यामुळे डम्पर एका बाजूला झुकून तिथेच अडकून पडला होता. अखेर क्रेनच्या साहाय्याने हा रुतलेला डम्पर त्या ठिकाणावरून काढण्यात आला. तोपर्यंत सदर मार्गावर रहदारीला अडथळा निर्माण झाला होता.
जर अपघाता वेळी त्या ठिकाणी एखादी स्कूलबस असती, अथवा खोदकामाच्या ठिकाणी खचलेल्या रस्त्यात स्कूलबसच अडकली असती तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली असती. वाशी परिसरात यापूर्वीही अशा प्रकारच्या दुर्घटना घडल्या आहेत. रस्त्यांचे खोदकाम केल्यानंतर तिथला खड्डा बुजवण्याकडे ठेकेदारासह प्रशासनाकडून डोळेझाक केली जाते. यामुळे रस्ता खोदल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी डांबरीकरण करण्याऐवजी मातीचा भराव टाकून थुकपट्टीची कामे केली जात आहेत. मागील चार महिन्यांत शहरात अनेक ठिकाणी विविध कामानिमित्ताने रस्त्यांची खोदकामे झाली आहेत. त्यापैकी बहुतांश ठिकाणी अशाच प्रकारे मातीचा भराव टाकून खड्डे बुजवण्यात आले आहेत. अशा ठिकाणी पावसामुळे पुन्हा खड्डे पडून अपघातांची शक्यता नाकारता येत नाही.