कळंबोली : सिडकोच्या तळोजा येथील क्षेपणभूमीबरोबरच वहाळ येथील डम्पिंग ग्राउंडवरही कचरा टाकण्यास ग्रामस्थांकडून तीव्र निरोध होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरातील कचरा येथील कोळीवाडा परिसरात गुजराती स्मशानभूमीजवळच्या मोकळ्या भूखंडावर टाकला जात आहे. मात्र या कचऱ्याला वारंवार आग लागत असल्याने दुर्गंधी आणि वायुप्रदूषणामुळे स्थानिक त्रस्त आहेत. पनवेल शहरात दररोज सुमारे पन्नास टन कचरा निर्माण होतो. हा कचरा कोळीवाड्यातील मोकळ्या भूखंडावर टाकला जातो. त्यावर प्रक्रिया करण्याकरिता कोणतीही यंत्रणा नाही. चार दिवसांपासून याठिकाणाहून धूर निघत होता, मात्र मंगळवारी कचऱ्याने पेट घेतल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. आग विझवण्यासाठी महापालिकेचे बंब घटनास्थळी दाखल झाले. दररोज कोळीवाड्यातील भूखंडावर हजारो टन कचरा जमा होतो. त्याला वारंवार आग लागत असल्याने नेहमीच धूर येतो. त्याचा त्रास कोळीवाड्याबरोबरच जवळच्या कल्पतरू सोसायटीतील रहिवाशांना होत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही काहीच उपाययोजना होत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. सिडकोची क्षेपणभूमी बंद आहे. याबाबत आयुक्तांनी पुढाकार घेतला असून क्षेपणभूमीला भेट दिली. सध्या वहाळ येथे कचरा टाकण्यात येत आहे. मध्यंतरी त्या ठिकाणी सुध्दा विरोध झाल्याने कोळीवाडा येथे कचरा टाकण्यात येत होता. लवकरच हा कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावली जाईल.- मंगेश चितळे, उपायुक्त, पनवेल महानगरपालिका
पनवेलमध्ये डम्पिंग ग्राउंडला आग
By admin | Published: March 29, 2017 5:58 AM