नवी मुंबई : सीबीडी सेक्टर ८ब परिसरातील वीर जवान क्रीडांगणावर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीग पडला आहे. मुलांच्या खेळासाठी असलेल्या मैदानाच्या जागेची दुरवस्था झाली असून, महापालिका मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. उन्हाळी सुट्यांमध्ये मुलांना खेळासाठी जागा उपलब्ध नसल्याने मनपाच्या बेजबाबदारपणा याला कारणीभूत असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली.क्रीडांगणाची तत्काळ दुरुस्ती करून मुलांना तसेच क्रीडाप्रेमींना हे मैदान खेळासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. या मैदानाच्या देखभाल व दुरुस्तीकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्याने या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. महापालिकेच्या वतीने शहरातील प्रत्येक विभागामध्ये मैदान बांधण्यात आले असून, त्यातील बहुतांश मैदानांची दुरवस्था झाली आहे. ती जागा वापराविना तशीच पडून राहिली आहे. या मैदानामध्ये गाड्या उभ्या करणे, स्टंटबाजी करणे तसेच आजूबाजूच्या परिसरातील बांधकामाचे साहित्य फेकून देणे, असे अनेक प्रकार निदर्शनास येत असून, या स्थानिक मुलांना खेळण्यासाठी मात्र रस्त्यावर जावे लागते, अशी प्रतिक्रिया स्मिता मोहंती यांनी व्यक्त केली आहे. या मैदानावर प्लास्टिकच्या पिशव्या, कागदाचे बोळे, दारूच्या बाटल्या आदी वस्तू या ठिकाणी पाहायला मिळतात. आजूबाजूच्या परिसरात सुरू असलेल्या बांधकामाचे साहित्य देखील या ठिकाणी पडले असून, हे साहित्य वेळोवेळी न उचलल्याने या वस्तूंचा ढीग साचला आहे. या ठिकाणी झालेल्या दुरवस्थेने मैदानाची जागा पार्किंगसाठी वापरली जात असून, खेळाडूंसाठी मात्र निरुपयोगी ठरत आहे. या संदर्भात बेलापूर विभागीय अधिकारी डी. के. गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
सीबीडीतील क्रीडांगणाच्या जागी डम्पिंग ग्राउंड
By admin | Published: April 12, 2016 1:24 AM