एसटी महामंडळाच्या भूखंडाचे झाले डम्पिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 12:00 AM2020-01-11T00:00:53+5:302020-01-11T00:01:01+5:30

राज्य परिवहन महामंडळाला सिडकोने तुर्भे व कोपरीमध्ये दोन विस्तीर्ण भूखंड दिले आहेत.

Dumping of ST corporation plot | एसटी महामंडळाच्या भूखंडाचे झाले डम्पिंग

एसटी महामंडळाच्या भूखंडाचे झाले डम्पिंग

Next

नामदेव मोरे 
नवी मुंबई : राज्य परिवहन महामंडळाला सिडकोने तुर्भे व कोपरीमध्ये दोन विस्तीर्ण भूखंड दिले आहेत. या भूखंडावर कार्यशाळा व बसटर्मिनल उभारण्यात महामंडळाला अपयश आले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आॅटोमोबाइल कॉलेजही कागदावरच राहिले असून सद्यस्थितीमध्ये दोन्ही भूखंडाचे डम्पिंग ग्राऊंडमध्ये रूपांतर झाले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील लोकसंख्या १४ लाखांपेक्षा जास्त झाली असून, सद्यस्थितीमध्ये शहरत एस.टी. महामंडळाचा एकही डेपो नाही. हजारो प्रवाशांना महामार्गावर बसची वाट पाहत उभे राहवे लागत आहे. वाशी, सानपाडा, नेरुळ, बेलापूरमध्ये महामार्गावरील पदपथावर हजारो प्रवासी दिवसभर उभे असतात. त्यांच्यासाठी निवारा शेडचीही सुविधा नाही. एसटी विनंती थांब्यांवर खासगी बसेस व प्रवासी वाहतूक करणाऱ्या इतर वाहनांनी अतिक्रमण केले आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाºया शहरात एस.टी.चा एकही डेपो नसल्याबद्दल प्रवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. वास्तविक सिडकोने एनएमएमटीच्या तुर्भे डेपोला लागून एसटी महामंडळाला बसटर्मिनल उभे करण्यासाठी भूखंड दिला आहे. त्या भूखंडावर छोटा डेपो विकसित केला होता. काही बसेसही येथून सुरू केल्या होत्या; परंतु सद्यस्थितीमध्ये हा डेपो बंद आहे. येथील कार्यालयाचे दरवाजे, खिडक्या तोडल्या असून तेथे मद्यपींचा अड्डा झाला आहे. डेपोच्या जागेवर अनधिकृतपणे खासगी वाहने व भंगार वाहने उभी केली जात आहेत. डेपोची संरक्षण भिंत कोसळली आहे. उन्हाळ्यामध्ये या भूखंडावर आंबा पॅकिंग करणाºया खोक्यांचे गोडाऊन तयार केले जात आहे. येथे होणाºया अतिक्रमणाकडेही एसटी महामंडळाचे व्यवस्थापन दुर्लक्ष करत आहे.
तुर्भे डेपोच्या भूखंडापासून दोन किलोमीटर अंतरावर कोपरीजवळही सिडकोने कार्यशाळेसाठी विस्तीर्ण भूखंड उपलब्ध करून दिला आहे. या भूखंडालाही फक्त संरक्षण कुंपण घातले आहे. भूखंड ताब्यात घेतल्यापासून जवळपास दोन दशकामध्ये अद्याप त्याचा विकास करता आलेला नाही. येथे लावण्यात आलेले फलकही गायब झाले आहेत. या भूखंडाचा कचराकुंडीप्रमाणे उपयोग होत आहे. प्रवेशद्वारावर व भूखंडावर सर्वत्र डेब्रिजचा भराव केला आहे. या भूखंडाच्या बाजूला जवळपास एक हजार झोपड्या झाल्या आहेत. एसटी च्या जागेवर अद्याप अतिक्रमण नसले तरी लवकरच त्यावरही झोपड्या उभारल्या जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप या जागेला आले आहे. जागा असूनही त्याचा वापर केला जात नसल्याबद्दल नागरिकांनी एसटी महामंडळाविषयी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु संपर्क होऊ शकला नाही.
।प्रवाशांचे हाल सुरू
नवी मुंबईमध्ये एसटीचा एकही डेपो नाही. यामुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण व दक्षिणेकडील राज्यांकडे जाणाºया प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवाशांना महामार्गावर वाशी, सानपाडा, नेरुळ व बेलापूरमध्ये उभे राहावे लागत आहे. महामार्गावर प्रवाशांसाठी निवारा शेडही नाहीत. महामार्गावर बसेस उभ्या केल्यामुळे वाहतूककोंडीही मोठ्याप्रमाणात होत आहे.
>फळ व्यापाऱ्यांनी मागितला भूखंड
बसटर्मिनसच्या भूखंडाचा काहीही उपयोग केला जात नाही. एसटी महामंडळाकडील हा भूखंड बाजार समितीला द्यावा व त्यांच्या माध्यमातून तो फळ व्यापारासाठी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी फळ व्यापाºयांनी केली असून, याविषयी निवेदनही पणनमंत्र्यांना दिले आहे.
>कॉलेजचा नामफलकही गायब
नवी मुंबईमधील एस.टी.च्या भूखंडावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मोटार वाहन अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा जानेवारी २०१६ मध्ये तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली होती. एसटीच्या राज्यात २५० कार्यशाळा व जवळपास तीन विशेष दुरुस्ती पथके आहेत. यामुळे महामंडळाचे स्वतंत्र कॉलेज सुरू करून कर्मचाºयांच्या मुलांनाही आरक्षण देण्याचे नियोजन केले होते. नवी मुंबईमधील दोन्ही भूखंडावर कॉलेजच्या नावाचे नामफलक लावले होते. सद्यस्थितीमध्ये नामफलकही गायब झाले आहेत.
>अतिक्रमणाकडे दुर्लक्ष
तुर्भेमधील भूखंडावर खासगी वाहनांसाठी अनधिकृत वाहनतळ सुरू केले आहेत. दिवसभर येथे बसेस व इतर वाहने उभी केली जात आहेत. भंगारमधील वाहनेही भूखंडावर ठेवली आहेत. फळव्यापारी त्यांची खोकीही या ठिकाणी ठेवत आहेत. २२ एप्रिल २०१९ ला एसटीच्या अधिकाºयांनी अतिक्रमणावर कारवाई करून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती; परंतु पथकाने पाठ फिरवताच पुन्हा अतिक्रमण झाले होते. येथील अतिक्रमणाकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.

Web Title: Dumping of ST corporation plot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.