दुभाजकाला धडकून डंपरचा अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 04:05 AM2018-04-23T04:05:08+5:302018-04-23T04:05:08+5:30
पुलाच्या सुरुवातीला मार्गदर्शक फलक नसल्याने अपघातांच्या घटना घडत आहेत.
नवी मुंबई : बेलापूरच्या दिशेने जाणारा डंपर सानपाडा येथे पुलाच्या दुभाजकाला धडकल्याची घटना रविवारी दुपारी घडली. समोर आलेल्या दुचाकीशी धडक टाळण्याच्या प्रयत्नात डंपरचालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचे समजते. या अपघातामुळे घटनास्थळी मोठ्या प्रमाणात टाकाऊ सिमेंट सांडले होते.
पुलाच्या सुरुवातीला मार्गदर्शक फलक नसल्याने अपघातांच्या घटना घडत आहेत. यामुळे सायन-पनवेल मार्गावरील, तसेच ठाणे-बेलापूर मार्गावरील पुलांच्या ठिकाणी अपघाताची मालिका सुरूच आहे. रविवारी दुपारी सानपाडा येथील पुलाच्या सुरुवातीला अशाच प्रकारे अपघात घडला. बेलापूरच्या दिशेने जाणारा भरधाव डंपर पुलाच्या दुभाजक कठड्यावर चढला. यावेळी डंपरमध्ये मुंबईतून बेलापूरच्या दिशेने नेले जाणारे टाकाऊ सिमेंट होते. अपघातामुळे हे सिमेंट रस्त्यावर सांडले होते.
सुदैवाने अपघातामध्ये कोणाला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, रस्त्यावर ओले सिमेंट सांडल्याने त्या ठिकाणी इतर वाहनांच्या अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. अखेर या अपघाताची माहिती मिळताच सानपाडा पोलीस व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त डंपरमधील टाकाऊ सिमेंट दुसऱ्या डंपरमध्ये काढून तो मार्गातून हटवण्यात आला. त्यानंतर सानपाडा पुलावरून बेलापूरच्या दिशेने जाणाºया मार्गातला अडथळा दूर झाला.