पनवेल - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे दहा गावांचे स्थलांतरण करण्यात येणार आहे. या गावांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्यात येत आहे; परंतु आता विमानतळाच्या गाभा क्षेत्रालगत असलेल्या डुंगी गावाचेही दहा गावांच्या धर्तीवर पुनर्वसन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुधवारी ग्रामस्थांसोबत झालेल्या बैठकीत सिडकोच्या अधिकाऱ्यांनी हे संकेत दिले आहेत.मागील चार दिवसांपासून अविरत कोसळणाºया पावसामुळे विमानतळ भराव क्षेत्रातील पारगांव आणि डुंगी गावात पाणी शिरले. त्यामुळे संतप्त झालेल्या येथील ग्रामस्थांनी मंगळवारी रास्ता रोको केला. या पार्श्वभूमीवर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी बुधवारी या गावाला भेट देऊन पाहणी केली. तसेच येथील ग्रामस्थांशी चर्चाही केली. या वेळी सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे-वर्मा, तहसीलदार दीपक आकडे, प्रकल्पग्रस्त नेते महेंद्र घरत, आर. सी. घरत, पारगावचे माजी सरपंच महेंद्र पाटील उपस्थित होते. मुसळधार पावसामुळे विमानतळ प्रकल्पाजवळ असलेल्या डुंगी गावात पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. गावात पाणी शिरल्याने ग्रामस्थांना घराबाहेर पडावे लागले. विशेष म्हणजे, विमानतळासाठी करण्यात आलेल्या भरावामुळे ही स्थिती निर्माण झाल्याची बाब ग्रामस्थांनी लोकेश चंद्र यांच्या निदर्शनास आणून दिली. डुंगी गावातील शिव मंदिरात लोकेश चंद्र व सहव्यवस्थापकीय संचालक प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी ऐकून घेतल्या. या वेळी पारगावचे ग्रामस्थही उपस्थित होते. डुंगी गावच्या पुनर्वसनासंदर्भात गांभीर्याने विचार केला जाईल. यासंबंधीचा प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन या वेळी सिडको अधिकाºयांनी ग्रामस्थांना दिले.डुंगी गावची लोकसंख्या ३५०च्या घरात आहे. या गावात एकूण ८० घरांचा समावेश आहे. भरावाच्या पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने, डुंगी गावात पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. लोकेश चंद्र आणि प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी ग्रामस्थांसोबत गावातील परिस्थितीची पाहणी केली.डुंगी गावात आलेल्या पुराची पाहणी करण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र हे स्वत: आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. मागील अनेक वर्षांपासून येथील प्रकल्पग्रस्त विविध समस्यांना तोंड देत आहेत. मात्र, अशाप्रकारे त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक कधी गावात आले नव्हते. लोकेश चंद्र यांच्या या भेटीमुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.डुंगी गावात उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी केली. भरावामुळे पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होतो की नाही, याची माहिती घेतली जात आहे. यात काही दोष आढळल्यास गावाच्या पुनर्वसनाबाबत नक्कीच विचार केला जाईल.- प्राजक्ता लवंगारे-वर्मा, सहव्यवस्थापकीय संचालक,सिडकोचार वेळा डुंगी गावात पुराचे पाणी शिरले आहे. सिडकोने केलेल्या भरावामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. सिडकोने डुंगी गावाचे योग्य पुनर्वसन करावे, तसेच भाड्याने राहण्यासाठी जागेची व्यवस्था करावी.- महेंद्र घरत,प्रकल्पग्रस्त नेते
डुंगी गावाचेही होणार पुनर्वसन? सिडको व्यवस्थापकीय संचालकांची ग्रामस्थांसोबत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 4:44 AM